Maharashtra Cabinet Expansion BJP Miniters Full List: विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाआधी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होणार आहे. 16 डिसेंबर ते 21 डिसेंबरदरम्यान होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ स्थापन केलं जाणार आहे. त्यामुळे आज सायंकाळपर्यंत मंत्र्यांना शपथ दिली जाणार आहे. निवडूण आलेल्या आमदारांच्या संख्येप्रमाणे मंत्रिपदं भारतीय जनता पार्टी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाटली जाणार आहेत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या संभाव्य नेत्यांची यादी समोर आलेली असतानाच आता भाजपाकडून काही आमदारांना मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी फोन येऊ लागले आहेत. त्यावरुनच फडणवीसांच्या 3.0 सरकारमध्ये मंत्रिपदाची माळ कोणकोणाच्या गळ्यात पडणार हे जवळपास निश्चित झालं आहे.


भाजपाकडून कोणाकोणाला फोन?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंत्रिमंडळाच्या विस्ताराला सहा तासांच्या आसपास कालावधी शिल्लक असतानाच भाजपाकडून त्यांच्या नवनिर्वाचित आमदारांपैकी काहींना फोन करण्यात आले आहेत. मंत्रिमंडळामध्ये समावेश करुन घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीकडून पक्षाच्या आमदारांना सकाळी 9 वाजल्यापासून फोन करण्यास सुरुवात झाली आहे. नितेश राणे आणि शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना मंत्रिपदासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांनी फोन केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच भाजपाच्या सर्वात श्रीमंत आमदारांपैकी एक असलेले आणि पर्यटनमंत्री म्हणून यापूर्वी मंत्रिमंडळात समावेश असलेल्या मंगलप्रभात लोढांनाही मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी फोन आला आहे. त्याचप्रमाणे गणेश नाईकांनाही मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी पक्षाकडून संपर्क साधण्यात आला आहे.


पंकजा मुंडेंनाही फोन


लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यानंतर विधानपरिषदेवर निवडून गेलेल्या पंकजा मुंडेंनाही मंत्रिपदासाठी भाजपाकडून फोन गेल्याचं वृत्त आहे. पंकजा मुंडे या फडणवीसांच्या पहिल्या कार्यकाळामध्ये महिला व बालविकास मंत्री होत्या. मध्यंतरी पंकजा यांना मोठा राजकीय संघर्ष करावा लागला होता. मात्र आता त्यांच्या गळ्यात थेट मंत्रिपदाची माळ पडणार असल्याची चिन्हं दिसत आहेत. पंकजांबरोबरच जयकुमार रावल, गिरीश महाजन यांचं स्थानही मंत्रिमंडळात निश्चित मानलं जात आहे.


नक्की वाचा >> अजित पवारांचं ठरलं! स्वत: फोन करुन 'या' 5 जणांना मंत्रिपदाची शपथ घेण्यास सांगितलं; भुजबळ, मुंडेंचा पत्ता कट?


या महिला आमदारालाही फोन


जिंतूरच्या भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर-साकोरे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मेघना बोर्डीकर-साकोरे यांना फोन आला आहे. मेघना बोर्डीकर-साकोरे यांच्या माध्यमातून परभणीला मंत्रिपद मिळणार आहे. मेघना बोर्डीकर-साकोरे या दुसऱ्यांदा आमदार झाल्या आहेत. राष्ट्रवादीच्या फौजिय्या खान यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर दहा वर्षांनी परभणीला मंत्रिपद मिळणार आहे. मेघना बोर्डीकर-साकोरे या नागपूरकडे रवाना झाल्या आहेत. 


पुण्यालाही मंत्रिपद निश्चित


पुण्याच्या पर्वतीमधून आमदार असलेल्या भाजपाच्या माधुरी मिसाळ यांची देखील मंत्रिपदावर वर्णी लागणार हे निश्चित मानलं जात आहे. माधुरी मिसाळ या 2009 पासून आमदार आहेत. तसेच भाजपाचे छत्रपती संभाजी नगरचे आमदार अतुल सावे यांची देखील मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याची माहिती समोर येत आहे.


आजच होणार शपथविधी


आजच नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचं जवळपास निश्चित आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री  नितीन गडकरींच्या अधिकृत कार्यक्रम पत्रिकेत याचा उल्लेख आहे. सोशल मीडियावर गडकरींच्या 15 डिसेंबरचा कार्यक्रम त्यांनी शेअर केला आहे. त्यामुळे दुपारी चार वाजता नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीचा कार्यक्रम असा उल्लेख दिसून येत आहे. मात्र मंत्रिमंडळाचा शपथविधी आज होणार असला तरी कोणाला कोणतं मंत्रिपद निळणार याबाबत उत्सुकता अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कायम आहे. 


जय्यत तयारी


नागपूरच्या राजभवनात आज होणा-या नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी काल सायंकाळपासूनच सुरू आहे. दुपारी 4 वाजता शपथविधी सोहळा होणार असल्याची माहिती समोर येत आहे.


भाजपाच्या मंत्र्यांची संपूर्ण यादी


भाजप मंत्रिपदाची यादी 'झी 24 तास' हाती


> चंद्रशेखर बावनकुळे
> नितेश राणे
> शिवेंद्रराजे भोसले
> चंद्रकांत पाटील
> गिरीश महाजन
> पंकजा मुंडे
> जयकुमार रावल
> राधाकृष्ष विखे-पाटील
> गणेश नाईक
> पंकज भोयर
> मेघना बोर्डिकर
> माधुरी मिसाळ
> अतुल सावे
> आकाश फुंडकर
> अशोक उईके
> आशिष शेलार
> मंगलप्रभात लोढा
> जयकुमार गोरे
> संजय सावकारे