डिसेंबरच्या शेवटी राज्यात मोठा राजकीय भूकंप? फडणवीस सरकारमधील `ते` एक रिक्त मंत्रिपद...
Maharashtra Cabinet Expansion: राज्याच्या मंत्रिमंडळाची क्षमता 43 असताना केवळ 42 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. एक जागा रिक्त का सोडण्यात आली आहे याबद्दल चर्चा सुरु असतानाच एका एक मोठा दावा करण्यात आला आहे.
Maharashtra Cabinet Expansion: रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील 43 जागांपैकी 42 जागांवर कोण मंत्री असतील हे निश्चित झालं आहे. मात्र मंत्रिमंडळातील एक जागा रिक्त ठेवण्यात आली असून या जागेबद्दलचं गूढ कायम असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरींनी ही रिक्त जागा कोणासाठी आहे याबद्दलचं थक्क करणारं विधान केलं आहे. अमोल मिटकरींनी व्यक्त केलेलं भाकित खरं असेल तर तो शरद पवारांसाठी सर्वात मोठा धक्का ठरेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
भुजबळांच्या नाराजीवर काय म्हणाले?
नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात सहभागी झालेल्या अमोल मिटकरींनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळेस त्यांना आधी छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न देण्यात आल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. भुजबळांना मंत्रिपद दिलेलं नाही. त्यांची नाराजी आहे, असं म्हणत प्रश्न विचारला गेला. त्यावर अमोल मिटकरींनी, "नाराजी कसली असेल? 41 आमदार निवडून आलेत राष्ट्रवादीचे. त्यापैकी 8 कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री असं असल्याने नाराजी होणं सहाजिक आहे. मला वाटत नाही कुठली नाराजी असेल. तुमच्याच माध्यमातून कळतंय की काही ओबीसी बांधव नाराज आहेत. तो पक्षाकडून राज्यसभेवर लवकरच जातील अशी माहिती तुमच्याकडूनच मिळाली. जर कोणाची नाराजी असेल तर पक्ष पातळीवर ती दूर करण्याचा प्रयत्न होतो. आमच्याच नाही तर भाजपामध्येही असे अनेक नेते आहेत. सुधीरभाऊंसारखे आहेत. शिंदे साहेबांच्या पक्षातील केसरकरांना शपथ घेता आली नाही. त्यामुळे नाराजी असणे सहाजिक आहे," असं उत्तर दिलं.
नाराज आहेत त्यांची बोळवण...
पुढे बोलताना मिटकरींनी, "जानेवारी, फेब्रुवारीमध्ये तिन्ही पक्ष एकत्र येऊन जी जी काही महामंडळं आहेत त्यावर जे जे राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत, नाराज आहेत त्यांची त्यावर बोळवण केली जाईल, असं वाटतं. तिन्ही पक्ष एकत्र येऊन पुढील पाच वर्ष टिकणारं सरकार चालवतील. नाराजीपेक्षा विदर्भातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे, असं मला वाटतं," असंही म्हटलं.
वन डाऊनला जो प्लेअर येतो ना त्या...
यानंतर मिटकरींना, "एक मंत्रिपद खाली ठेवलं आहे. ते नेमकं कोणासाठी आहे? जयंत पाटलांसाठी आहे की कोणासाठी आहे?" असा प्रश्न पत्रकाराने विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना मिटकरींनी राज्यात राजकीय भूकंप होईल अशा अर्थाचं भाकित केलं आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासाठी ही जागा खाली ठेवल्याचं मत व्यक्त केलं आहे. "मागेही एक मंत्रिपद त्यांच्यासाठीच खाली ठेवलं होतं. त्यांनी त्यावेळेस फार विचार केला. नंतरच्या काळात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला बहुमत मिळालं. त्यांना असं वाटलं की आपल्याला तिथे जाण्याची गरज नाही. पण आता अशी परिस्थिती आहे की मला असं वाटतं की ते जे बोललेत ना योग्य व्यक्ती, योग्य वेळ, योग्य निर्णय घेतील. तुम्ही बघा आता. वन डाऊनला जो प्लेअर येतो ना त्या प्लेअरसाठी ठेवलेली आहे," असं उत्तर मिटकरींनी दिलं.
डिसेंबरच्या शेवटपर्यंत...
"मला जेवढी माहिती आहे, ते लवकरच नक्की येतील. मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे. योग्य वेळ झालेली आहे. आता योग्य निर्णय डिसेंबरच्या शेवटपर्यंत होणार. एका जागेच्या मागील तेच कारण आहे योग्य व्यक्ती, योग्य निर्णय, योग्य वेळ त्यासाठीच एक जागा खाली आहे," असं सूचक विधान मिटकरींनी केलं आहे. खरोखरच जयंत पाटलांनी शरद पवारांची साथ सोडली तर तो त्यांच्यासाठी पक्षफुटीइतकाच मोठा फटका ठरेल असं मत व्यक्त केलं जात आहे.