Maharashtra Female Police Officer Climb Mount Everest :एका महिला पोलिस अधिकाऱ्याने वयाच्या 50 व्या वर्षी जगातील सर्वोच्च शिखर असणारे माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम केला आहे. असा विक्रम करणारी ती महाराष्ट्र पोलीस दलातील पहिलीच महिला ठरली आहे. द्वारका विश्वनाथ डोखे असे या पोलिस महिलेचे नाव आहे. या अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात राहणाऱ्या आहेत. सध्या त्या नाशिक पोलिसात निरीक्षक पदावर कार्यरत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात राहणाऱ्या द्वारका विश्वनाथ डोखे यांनी माऊंट एव्हरेस्ट सर केला आहे. काही वर्षांपूर्वी द्वारका यांच्या वाचनात साद देती हिम शिखरे हे पुस्तक आलं होतं. त्यांना बर्फाच्छादित डोंगर सर करण्याचे आकर्षण वाटू लागले. त्यांनी अनेक छोटे डोंगर सर केले. मात्र सर्वोच्च हिम शिखर असणारे माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचे ध्येय ठरवले होते. त्यांनी त्यासाठी मेहनतही सुरु केली. 


पोलीस दलाचा ध्वज फडकवत दिली मानवंदना


द्वारका यांनी 30 मार्च 2024 ला माऊंट एव्हरेस्ट चढायला सुरुवात केली. यानंतर 22 मे 2024 रोजी साधारण 50 दिवसांच्या प्रयत्नात त्या माऊंट एव्हरेस्टच्या शिखरावर पोहचल्या. सर्वोच्च शिखरावर पोहोचतात द्वारका यांनी भारताचा ध्वज हातात घेत राष्ट्रगीत म्हटले. त्यानंतर महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वज फडकवत मानवंदना दिली. त्यानंतर दिवंगत आई वडिलांचा फोटो झळकवत त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. हा क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात भावूक करणारा क्षण होता, अशी प्रतिक्रिया द्वारका डोखे यांनी दिली आहे. 


सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव


एमपीएससी केल्यानंतर 2006 साली द्वारका महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू झाल्या होत्या. आज त्यांचे वय 50 वर्षे असून त्या नाशिक येथे पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. द्वारका अविवाहित असल्या तरी त्यांना नोकरीसोबत त्यांचे ध्येय गाठण्यासाठी कुटुंबियांची मिळाली साथ आणि वरिष्ठांकडून मिळालेले प्रोत्साहन यामुळे त्या एवढ्या मोठ्या विक्रमाला गवसणी घालू शकल्या. श्रीरामपूर शहरात त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली तर सर्वच स्तरातून द्वारका यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो. 


द्वारका डोखे यांनी नोकरीसह आपले ध्येय गाठण्यासाठी केलेली मेहनत आणि जिद्द नक्कीच इतरांसाठी प्रेरणादायी आहे. म्हणूनच, प्रत्येकाने आपल्या आयुष्यातील सर्वोच्च शिखर गाठण्यासाठी अथक परिश्रम करावेत असा संदेश देखील त्यांनी दिला आहे.