मुंबई : राज्यातील अंगणवाडी सेविकांसाठी ( Anganwadi workers) राज्य सरकारने ( Maharashtra State Government) दिवाळीची (Diwali) भाऊबीज (Bhai Dooj) भेट दिली आहे. राज्यात ९३ हजार ३४८ अंगणवाडी सेविका, ८८ हजार३५३ अंगणवाडी ( Anganwadi ) मदतनीस आणि ११ हजार ३४१ मिनी अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी दोन हजार रुपये भाऊबीज भेट देण्यात येणार आहे. यासाठी ३८ कोटी६१  लाख रुपये निधी वितरित करण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका या मानधनी कर्मचाऱ्यांना यावर्षी भाऊबीज भेट म्हणून दोन हजार रुपये देण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. कोरोना काळात लाखो बालके, स्तनदा मातांना घरपोच आहार पोहोचवणे तसेच ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे; त्यामुळे दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट देण्यात येत असल्याचे महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले. 


कोरोनाच्या लॉकडाऊन काळात अभूतपुर्व परिस्थिती निर्माण झाली असताना दुर्गम भागात चालत जाऊन, नावेने नदी पार करत अशा विविध अडचणींवर मात करत अंगणवाडी सेविकांनी घरोघरी पोषण आहार पोहोचविला. स्थलांतरित मजूरांच्या अपत्यांचीही काळजी घेतली. या सगळ्यामुळेच पोषण माह कार्यक्रमात महाराष्ट्राने देशात अव्वल क्रमांक पटकावला, अशी माहिती मंत्री ॲड. ठाकूर यांनी दिली. 


कोविडमुक्त महाराष्ट्रासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या अभियानातही घरोघरी जाऊन महत्त्वाची जबाबदारी महिलांनी बजावली आहे. त्यांच्या कामाचा शासनाला अभिमान आहे. त्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी दिवाळीपूर्वी भाऊबीज भेट देण्यात येत आहे, असेही मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या.