सलग दुसऱ्या दिवशी `मुसळधार`; लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले
Konkan Railway Timetable Affected: मागील दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेला देखील बसलाय.
Konkan Railway Timetable Affected: मुंबई, ठाणेसह कोकणात सलग 2 दिवस पाऊस पडतोय. यामुळे लोकल प्रवासावर परिणाम झालाय, रस्ते वाहूतक कोलमडलीय. यात प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. शालेय विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आलीय. दरम्यान लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही याचा परिणाम झालाय. त्यामुळे दूरच्या प्रवासासाठी तुम्ही आधीच नियोजन करुन ठेवला असाल तर तुमच्यासाठी महत्वाची अपडेट आहे.
मागील दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेला देखील बसलाय. कोकण रेल्वेच वेळापत्रक कोलमडले असून सर्वच गाड्या उशिराने धावत आहेत. मुंबईहुन सुटणाऱ्या सर्वच गाड्या दोन ते तीन तास उशिराने धावत असून कोकण रेल्वेने याबाबत कोणतीही अधिसूचना दिलेली नाहीय. यामुळे प्रवासी रेल्वे स्थानकावर पोहोचत असले तरी त्यांना बराच वेळ रेल्वेची वाट पाहावी लागत आहे.
कोकणात शाळांना सुट्टी
आज मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे आणि कोकणातून ही बातमी येतेय. मुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळे मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे आणि कोकणात शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आलीय. मुंबईसह रत्नागिरी, सिंधुदुर्गात पावसाचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आलाय. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शाळा आज बंद असतील. नवी मुंबईतही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे मनपा आयुक्तांनी शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या तसंच सर्व व्यवस्थापनांच्या शाळा आज बंद राहणारेत. ठाणे जिल्ह्यातील पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व शाळा तसंच बारावीपर्यंत कॉलेजेसना सुट्टी देण्यात आलीय. पुण्यातीलही सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आलीय.
परीक्षा पुढे ढकलल्या
मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थीहित लक्षात घेता व संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या 9 जुलै रोजी सकाळी आणि दुपारच्या सत्रात होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या सर्व परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौदळे यांनी सांगितले.
मुंबईत आज रेड अलर्ट
पुढील 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार तर काही ठिकाणी अति मुसळधार पावसाची शक्यताय. पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यासाठी हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केलाय. तसंच रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात रेड अलर्ट घोषित करण्यात आलाय. पुणे आणि सातारा जिल्ह्यासाठी ही हवामान खात्याचा रेड अलर्ट आहे. सातारा, कोल्हापूर परिसरातील घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
Maharshtra Weather News : सावध व्हा! विश्रांती घेतलेला पाऊस दुप्पट ताकदीनं परतणार; मुंबई- पुण्याला रेड तर, कोकणात ऑरेंज अलर्ट
अति मुसळधार पावसाचा इशारा (Red Alert) लक्षात घेता सर्वांनी सतर्क रहावे, आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे तसेच प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी देण्यात येणार्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा मदत सेवा क्रमांक 1916 यावर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
दरम्यान मुंबईकर नागरिकांची गैरसोय होणार नाही, यादृष्टीने महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज आहे. मुंबईतील पावसाची परिस्थिती पाहता मुंबई महानगरातील सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांना उद्या मंगळवार दिनांक आज 9 जुलै रोजी सुटी जाहीर केली आहे.