Maharshtra Weather News : महाराष्ट्रात धुमाकूळ घालणाऱ्या पावसानं सोमवारी सायंकाळपासून काही भागांमध्ये उसंत घेतली असली तरीही हा पाऊस राज्यात पुन्हा जोर धरणार आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार मान्सून पुन्हा सक्रिय झाल्यामुलं राज्यात त्यानं धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. पुढील 24 तासांमध्ये हा मान्सून मराठवाडा आणि विदर्भात जोर वाढवणार असून, मुंबईतही चित्र वेगळं नसेल. उलटपक्षी शहरातील काही भागांमध्ये पावसानं उसंत घेतली असली तरीही मंगळवारी आणि पुढील 48 तासांमध्ये तो दुप्पट ताकदीनं कोसळणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
सोमवारी मुंबईला ठप्प करणारा मुसळधार पाऊस पुढील 24 तासात मुंबई (Mumbai Rain) शहर आणि उपनगरात पुन्हा तितक्यात ताकदीनं हजेरी लावणार असल्याचा अंदाज आहे. शहरातील किनारपट्टी भागांना सध्या सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांना गरज असेल तरच घराबाहेर पडण्य़ाच्या सूचना शासनानं केल्या आहे. मुंबईनजीक असणाऱ्या पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑरेंज आणि निवडक भागांमध्ये रेड अलर्ट घोषित केला आहे. राज्याच्या पश्चिमेकडे येणाऱ्या सातारा, सांगली आणि पुणे जिल्ह्यासाठीसुद्धा हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केल्यामुळं प्रशासन सतर्क झालं आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर, तिथं विदर्भातील अकोला,अमरावती, यवतमाळसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा असून, काही विभागांमध्ये यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे.
मागील 48 तासांपासून झालेल्या पावसामुळं कोल्हापूर, रायगड भागांमधील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. तर, लहानसहान जलप्रवाहसुद्धा मोठ्या ताकदीनं वाहू लागले आहेत. उपलब्ध माहितीनुसार कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. ज्यामुळं जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहू लागल्या.
सध्याच्या घडीला पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर पडलं असून, नदीची पाणीपातळी 32 फूट 2 इंच झाली आहे. एका रात्रीत दीड फूट पाणी वाढलं असून, त्यामुळं जिल्ह्यातील 50 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. 14 धरण क्षेत्रात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्यामुळं आता पुढील परिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेवून आहे.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे आणि कोकणातील सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नवी मुंबईत आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळं खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यातही पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व शाळा तसंच बारावीपर्यंत कॉलेजना सुट्टी देण्यात आली आहे. तिथं रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळा आणि कॉलेज पावसामुळं बंद ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांनी गरज असेल आणि अती महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. त्यामुळं पावसाच्या या दिवसांमध्ये सावध राहा, स्वत:ची आणि इतरांची काळजी घ्या.