हरवलेला मान्सून पुन्हा कधी सक्रिय होणार? हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
Maharashtra Monsoon: भारताच्या भूमीकडे जे बाष्प घेऊन येणारे वारे आहेत त्या वाऱ्याचा वेग मंदावला.
Maharashtra Monsoon: मान्सून वेळेआधीच महाराष्ट्रात दाखल झाला. भारतात दाखल झाला. मात्र हा मान्सून नेमका गेलाय कुठे? असा प्रश्न आता पडू लागलाय. कारण जून महिना संपत आला तरी पाऊस म्हणावा तितका महाराष्ट्रात झालेला नाही. याच विषयी मुंबई प्रादेशिक हवामानाचे प्रमुख सुनील कांबळे यांनी झी 24 तासला महत्वाची माहिती दिली आहे.
सध्या मान्सूनचा वेग मंदावला आहे. हा वेग पुन्हा एकदा 24 ते 25 जून पासून सुरू होईल. पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होईल असं शास्त्रज्ञ सुनील कांबळे म्हणाले. भारताच्या भूमीकडे जे बाष्प घेऊन येणारे वारे आहेत त्या वाऱ्याचा वेग मंदावल्याचे ते म्हणाले.
या मंदावलेल्या वेगामुळे मान्सून सक्रिय असल्याचे दिसते. वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटर प्रति वेगाने असावा लागतो तेव्हा बाष्प त्या वाऱ्यासोबत येत असतात आणि पाऊस पडत असतो. मात्र सध्या याचा वेग कमी झाला आहे. त्यामुळे पावसाचं प्रमाण कमी झालंय. पण हा वेग 24 ते 25 जून पासून वाढणार असल्याचे कांबळे म्हणाले.
मुंबईत पावसाची शक्यता
दरम्यान पुढच्या 24 तासांत मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने ही शक्यता वर्तवली आहे. सकाळपासून मुंबईत पावसाची रिपरिप सुरू आहे.