Maharashtra Weather Update: राज्यात गेल्या आठवड्यात पावसाने थैमान घातलं होतं. अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती.  मात्र आता राज्यात पावसाचा जोर ओसरणार आहे. हवामान विभागाने तशी शक्यता वर्तवली आहे. पुढील चार दिवसांत राज्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पावसामुळं पूरस्थिती निर्माण झालेल्या जिल्ह्यांना आता दिलासा मिळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात गेल्या आठवड्यात पावसाने हाहाकार माजवला होता. घाट माथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. तर, धरणांच्या पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील जलसाठा वाढला आहे. त्यामुळं जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. मात्र आता जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचा जोर ओसरणार आहे. सोमवार ते गुरुवारपर्यंत राज्यात कुठेही रेड व ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. 


31 जुलैपर्यंत मराठवाडा, नाशिक, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर,पुणे येथे मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याभागात 1 ऑगस्टपासून जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण व विदर्भातील जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील चार दिवस येथे तुरळक ठिकाणी पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 


पंचगंगा नदीची पाणी पातळी झाली कमी


कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी कमी होत आहे. गेल्या 24 तासात 1 फूट 2 इंचाने पंचगंगा नदीची पाणी पातळी कमी झाली आहे. पण दुसरीकडे कृष्णा नदीची पाणी पातळी वाढली असल्याने शिरोळ तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील पंचगंगा, वारणा, दूधगंगा या प्रमुख नद्यांसह इतर नद्यांचे पाणी कृष्णा नदीला जाऊन मिळतात, त्यामुळे कृष्णेची पाणी पातळी वाढ होऊन शिरोळ तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नदीकडच्या गावातील लोकांचे स्थलांतर केले आहे.