माथेरानची राणी सुरू झाली खरी मात्र, तरीही पर्यटकांचा हिरमोड; कारण...
Neral-Matheran Iconic Mini Train: माथेरानची राणी म्हणजेच मिनी ट्रेन पुन्हा पर्यटकांच्या सेवेत दाखल झाली आहे.
Neral-Matheran Iconic Mini Train: माथेरानची राणी म्हणजेच मिनी ट्रेन पुन्हा रुळांवर धावण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, असं असले तरी पर्यटक फारसे खुश नाहीयेत. कारण माथेरानच्या राणीच्या विस्टाडोम डबा जोडला नसल्याने पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडले आहे. या डब्याची नियमित दुरुस्ती शिल्लक आहे. त्यामुळं माथेरानच्या राणीचा विस्टाडोमविनाच प्रवास सुरू आहे.
पर्यटकांची लाडकी माथेरानची राणी 1 नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू झाली आहे. माथेरानची राणी तब्बल चार महिने बंद होती. पावसाळ्यात अतिवृष्टीमुळं दरडी कोसळण्याची भिती असते. त्यामुळं माथेरानची मिनिट्रेन बंद ठेवण्यात येते. मात्र यंदा तांत्रिक बाबींमुळं सेवा सुरू होण्यास उशीर झाला होता. दरवर्षी 15 ऑक्टोबरपर्यंत ही सेवा सुरू होते. मात्र यंदा 1 नोव्हेंबरपासून ही सेवा सुरू झाली. बुधवारपासून माथेरानच्या राणीची सफर सुरू झाली आहे. मिनी ट्रेनला विस्टाडोम डबा जोडला जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र विस्टाडोम डब्याविनाच मिनी ट्रनचा प्रवास सुरू झाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
2019मध्ये नेरळ-माथेरान मिनी ट्रेनला विस्टाडोम डबा जोडल्याने पर्यटकांचा मोठा प्रतिसाद मिळत होता. पारदर्शक खिडक्या आणि छत असलेल्या विस्टाडोम डब्यातून निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव घेता येत असल्याचे पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. मात्र विस्टाडोम नसल्याने प्रवाशांचा हिरमोड झाला आहे.
नेरळ-माथेरान रेल्वे मार्ग 1907मध्ये सुरू झाला
नेरळ माथेरान मिनी ट्रेन 100 वर्षांहून अधिक जुनी आहे. नेरळ-माथेरान रेल्वे मार्ग 1907 मध्ये सुरू झाला. पर्यटकांना माथेरानला घेऊन जाणार्या वाहतुकीचं एकमेव साधन म्हणजे मिनी ट्रेन आहे. येथे मोटार वाहनांना परवानगी नाही. पर्यटकांना नेरळ ते माथेरान जाण्यासाठी ही मिनीट्रेन अतिशय सोयीची आहे. त्यामुळे ती बंद राहिल्यास पर्यटकांना माथेरानला जाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. तसंच, या मार्गावर फेऱ्या वाढवल्यास पर्यटनात आणखी वाढ होऊ शकते, अशी व्यावसायिकांचे म्हणणे आहे.