सचिन कसबे, झी मीडिया, पंढरपूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात राजकीय घडामोडींनी वेग घेतलाय. पंढरपूरच्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष असलेल्या अभिजित पाटील (Abhijit Patil) यांनी देखील निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केलीय. त्यादृष्टीनं शक्ति प्रदर्शनासाठी वाढदिवसाचा मुहूर्त निवडला. त्यांच्या वाढदिवसाला हजारो कार्यकर्ते जमले होते. जेसीबीतून पुष्पवृष्टीही करण्यात आली. विशेष म्हणजे वाढदिवसाचा केक देखील विधान भवनासारखा होता आणि केकवर अभिजित पाटील यांचा फोटो लावलेला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप, राष्ट्रवादी काँगेस आणि पुन्हा भाजप नेत्यांच्या जवळ असलेल्या अभिजित पाटलांनी सत्काराच्या भाषणात विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election) लढण्याचे संकेत दिलेत. मात्र पंढरपूर की  माढा ? महायुती की महाविकास आघाडी ? या गोष्टी मात्र त्यांनी गुलदस्त्यात ठेवल्यात. शिवरायांनी आग्र्याहून कशी सुटका करून घेतली, त्या इतिहासाला उजाळा देत त्यांनी पुढची दिशा कशी असेल ? याबाबत सूचक वक्तव्य केलं. 


कोण आहेत अभिजीत पाटील?
अभिजित पाटील यांनी अगदी कमी कालावधीत तरुण साखर स्रमाट अशी ओळख निर्माण केलीय. शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात देखील प्रवेश केला होता. अभिजीत पाटलांची वाढती ताकद पाहून भाजपनं त्यांच्या साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई केली. जप्ती टाळण्यासाठी त्यांनी भाजपच्या नेत्यांशी संधान साधलं आणि माढ्यात भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना पाठिंबा दिला. भाजपच्या जवळीकीनंतर त्यांच्या कारखान्याला 347 कोटी रुपयांचे कर्ज देखील मंजूर करण्यात आलंय.


आता विधानसभेच्या मैदानात उतरण्यासाठी अभिजित पाटील भाजपला सोडून पुन्हा महाविकास आघाडीच्या गोटात दाखल होणार का ? याची चर्चा सुरू झालीय. विधानसभेसाठी अभिजित पाटलांचा गनिमी कावा यशस्वी होणार का ? हे पाहावं लागणार आहे