Sanjay Raut and Ajit Pawar clashed : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि अजित पवार यांच्यात पुन्हा जुंपलीय. अजित पवारांना प्रत्युत्तर देताना राऊत यांची जीभ पुन्हा घसरली. नेत्यांनी तारतम्य बाळगावं असं विरोधी पक्षनेते अजित पवारांनी राऊतांना सुनावलं. त्यावर पलटवार करताना राऊतांनी पातळी सोडून टीका केली. मात्र राऊत बोलल्याने अंगाला भोकं पडत नाहीत असं प्रत्युत्तर अजित पवार यांनी दिले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासंदर्भात प्रश्न विचारताच ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत काल ऑन कॅमेरा थुंकले होते. त्यांच्या या कृतीचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. शिंदे यांच्या शिवसेनेकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. याबाबत आज माध्यमांशी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर टीकाही केली आहे. आज संजय राऊत त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर गेले आहेत. तिथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राजकीय नेत्यांनी बोलताना, कृती करताना तारतम्य बाळगावं असं विरोधी पक्षनेते अजित पवारांनी संजय राऊतांचं नाव न घेता सुनावलं. खासदार श्रीकांत शिंदे यांच्याविषयी प्रश्न विचारल्यावर काल संजय राऊत पत्रकार परिषदेत थुंकले. त्यावर अजित पवारांनी ही प्रतिक्रिया दिलीय.


याबाबत संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया देताना आपल्या थुंकण्याचे समर्थन केले. त्यांनी सावरकर यांचे उदाहरण दिले. सावरकरही थुंकले होते. रोज 130 कोटी जनतेला माफी मागावी लागेल. रोज कोणी ना कोणी थुंकत असतात. मी सार्वजनिक ठिकाणी थुंकलो नाही. मी राजकीय नेत्यांवर थुंकलो नाही, बेईमानांची नावे घेतल्यावर थुंकलो. हा फरक आहे. 


मला सुरक्षेची गरज नाही - राऊत


 संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यानिमित्त संजय राऊत यांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे. याबाबत ते म्हणाले की, मला सुरक्षेची गरज नाही. मी माझ्या शिवसैनिकांसोबत त्र्यंबकला जातोय. तिथे मंदिरात जाऊन धार्मिक विधी करुन परत येऊ. सुरक्षा कोणाला आहे, ज्या आमदारांनी बेईमानी केली त्यांना सुरक्षा आहे. ही सुरक्षा मी बोलावलेली नाही, असे राऊत म्हणाले.


राऊत म्हणाले की, धरणांमध्ये मुतण्यापेक्षा थुंकणं चांगलं. तसेच ज्याचं जळतं त्याला कळते. आम्ही भोगतो आहोत. आम्ही सगळं भोगूनही जमिनीवर उभे आहोत. मी माझ्या पक्षाबरोबर ठामपणे उभा आहे. आमच्या मनात पक्ष बदलण्याचा आणि संकटं येत आहेत म्हणून भाजपासारख्या पक्षाबरोबर सूत जुळवण्याचा आमचा विचार होत नाही.