Maharashtra Politics Fight For Chief Minister Post:  विधानसभा निवडणुकांची घोषणा पुढील काही महिन्यांमध्ये होणार असून महाविकास आघाडीने या निवडणुकीसाठी तयारीला सुरुवात केली आहे. असं असतानाच आता मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण यावरुन महाविकास आघाडीमधील तिन्ही घटकपक्षांमध्ये मतभेद असल्याचं चित्र दिसत आहे. सध्या महाविकास आघाडीमध्ये यावरुन घमासान सुरु आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या गटाचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी सूचक विधान करत उद्धव ठाकरेंच्या नावालाच मुख्यमंत्री म्हणून पसंती असल्याचं आणि तेच महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील असं सूचित केल्यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्षातील नेत्यांनी आपली मतं मांडली आहेत. 


संजय राऊत नक्की काय म्हणाले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी चर्चा करताना, "मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं हा धोका आहे. महाराष्ट्राने महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचं काम पाहिलं आहे. लोकसभेला अनेक घटकांनी उद्धव ठाकरेंना पाहून मतदान केलं आहे. अर्थात तिन्ही पक्षांची एकत्र ताकद होती. मात्र बिनचेहऱ्याचं सरकार अजिबात चालणार नाही," असं सूचक विधान केलं आहे.


शरद पवार गटाने यावर काय म्हटलं?


संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोणीही मुख्यमंत्री कोण असेल यासंदर्भात आताच विधानं करु नयेत असं मत व्यक्त केलं आहे. "जयंत पाटील मुख्यमंत्री किंवा अ, ब, क मुख्यमंत्री यामध्ये महाविकास आघाडीच्या कुठल्याही नेत्याने स्वारस्य ठेवू नये. आम्ही सत्तेवर आलं पाहिजे हे स्वारस्य सर्वात आधी हवं. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये स्पर्धा होऊ नये. आज कोणत्याही पक्षाने नावं घोषित करण्याने यामने महाविकास आघाडीच्या एकतेमध्ये गॅप तयार होऊ नये असं मला वाटतं. त्यामुळे महाविकास आघाडीतील कुठल्याही मंत्र्याने, नेत्याने अमका मुख्यमंत्री होणार, तमका मुख्यमंत्री होणार अशी विधानं टाळली पाहिजे," असं मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.


वडेट्टीवार म्हणाले, 'जागावाटप अन् मुख्यमंत्री पदाचा चेहरा...'


तर काँग्रेसचे नेते तसेच विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण यासंदर्भात विधान केलं आहे. "महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये जो फॉर्म्युला ठरेल तोच अंतिम असेल. ती बैठकच झालेली नाही. लवकरच ही बैठक होईल. जागावाटप, मुख्यमंत्री पदाचा चेहरा यासारख्या गोष्टींवर चर्चा होईल. मी वैयक्तिक काहीही म्हणण्यापैकी त्या बैठकीत निर्णय होईल. तिथेच चर्चा होईल आणि महाविकास आघाडी काय ते ठरवले," असं वडेट्टीवार म्हणाले आहेत.


मुख्यमंत्री हा नंतरचा विषय


विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवेंनी राऊतांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना, "यांना (महायुतीला) पराभूत करणं हे आमचं उद्दीष्ट आहे. मुख्यमंत्री हा नंतरचा विषय आहे, असं मला वाटतं, असं उद्धव ठाकरे गटाचे नेते तसेच म्हटलं आहे," असं म्हटलं आहे. तर, "कोणाचा चेहरा म्हणजे आम्ही आज एकत्र आहोत. एकत्र लढणार आहोत आणि जिंकणार आहोत, हे महत्त्वाचं आहे," अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.