शरद पवार - अजित पवार पुन्हा एकत्र! पुण्यात होणार महत्त्वाची बैठक
Maharashtra Politics : राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी मनधरणी करण्यासाठी अजित पवार गटाकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. अशातच आता पुण्यात पुन्हा एकदा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत.
अरुण कोल्हटकर, झी मीडिया, पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. याआधीही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची अजित पवार यांनी गुप्तपणे पुण्यात भेट घेतली होती. मात्र फुटीनंतर सार्वजनिक रित्या दोघेही एकत्र आले नव्हते. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे अध्यक्ष म्हणजे शरद पवार आणि अजित पवार आज पुण्यामध्ये (Pune) एका बैठकीसाठी एकत्र येणार आहेत.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूच्या संचालक मंडळाची शुक्रवारी मांजरी इथे बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूच्या संचालक मंडळाची याआधी एक बैठक झाली होती. अजित पवार त्या बैठकीला गैरहजर होते. मात्र त्याच दिवशी अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. दोघांमध्ये उद्योजक अतुल चोरडिया यांच्या घरी भेट झाली होती. त्या गुप्त भेटीची चर्चा पुढे बरेच दिवस सुरू होती.
त्याचप्रमाणे पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान समारंभाच्या निमित्तानं जाहीर कार्यक्रमासाठी म्हणून दोघे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर आले होते. मात्र त्यावेळी अजित पवार यांनी शरद पवार यांची नजरा नजर होणार नाही याची आवर्जून काळजी घेतली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज दोन्ही नेते बैठकीसाठी म्हणून एकत्र येणार आहेत. विशेष म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार रोहित तसेच अजित पवारांच्या सोबत गेलेले दिलीप वळसे पाटील हे देखील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूचे संचालक आहेत. त्यामुळे या नेत्यांची पण उपस्थिती आजच्या बैठकीसाठी असणार आहे. या बैठकीमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये काय स्वरूपाचा संवाद घडतो त्याबद्दल उत्सुकता आहे.
शरद पवार गटाचा अजित पवार गटाला डिजिटल दणका!
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचं एक्स हँडल (पूर्वीचे ट्वीटर) सस्पेंड करण्यात आलं होतं. या ट्विटर हँडलवर अकाऊंट सस्पेंड असल्याचा मेसेज दिसत होता. शरद पवार गटाने या ट्विटर हँडलच्या विरोधात तक्रार केल्यानंतर ट्विटरकडून ही कारवाई करण्यात आली होती. अजित पवार गटाने नियमांचं उल्लंघन केल्याने ही कारवाई करण्यात आल्याचं ट्विटरने सांगितलं होतं.