Maharashtra Politics : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Sabha in Jalgaon) यांची रविवारी सभा होणार आहे. या सभेआधीपासूनच जळगावातील वातावरण तापलं आहे. या पाश्वभूमीवर जळगावचे पालकमंत्री तथा शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील (gulabrao patil) यांना या सभेतून लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे गुलाबराव पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडूनही ठाकरे गटाला प्रत्युत्तर देण्यात येत आहे. सभेचा आढावा घेण्यासाठी पोहोचलेल्या खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना काळे झेंडे दाखवल्या नंतर गुलाबराव पाटील यांनी सभेत घुसून परत जाऊन दाखवावे, असे आव्हान दिले होते. त्यावर उत्तर देताना गुलाबराव पाटील यांनी आम्ही दगड मारून सभा बंद करणारे लोक आहोत असं म्हणत इशारा दिला होता. त्याबाबत बोलताना खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी इशारा दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे-बंगळुरू महामार्गावरील नवले पुलाजवळ झालेल्या भीषण अपघाताची पाहणी करण्यासाठी  राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे घटनास्थळी आल्या होता. ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला असावा, अशी शक्यता सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. यावेळी बोलताना त्यांनी गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या आव्हानावर प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्रामध्ये गुंडागर्दी चालणार नाही, असे म्हणत ही बाब मी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.


"सत्तेत असणाऱ्या आमदार दगड फेकीची भाषा करत असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो. हा गंभीर विषय असून याबाबत मी संसदेत निश्चित भूमिका मांडणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनीही याबाबत भूमिका मांडली पाहिजे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यातील एखादा नेता एखाद्या ठिकाणी सभेसाठी जात असेल तर त्यात गैर काय? आम्ही त्याच्यावर दगड मारू, अशी भाषा सत्तेतील आमदार करतात. महाराष्ट्रामध्ये गुंडागर्दी चालणार नाही. अमित शाह यांच्या कानावर ही गोष्ट घालावी लागेल," असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला.


काय म्हणाले होते गुलाबराव पाटील?


"या नतद्रष्ट लोकांनी शिवसेनेची वाट लावली. त्यांना आमचा विरोध कायम राहणार आहे. आम्हाला तुम्ही शिकवू नका राऊत. संजय राऊत हे कुठल्याच आंदोलनात नव्हते. संजय राऊत यांना शिवेसेनेचं आंदोलन कसं असतं माहित नाही. दगड मारून आंदोलन आणि सभा बंद करणारे लोक आहोत आम्ही. त्यामुळे राऊतांनी आम्हाला चॅलेंज करू नये," असा इशारा गुलाबराव पाटील यांनी दिला होता.