रायगडः मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं राज्यातील बहुंताश भागात दरड कोसळण्याचे प्रकार घडले आहेत. बुधवारी रात्री रायगडमधील इरसालगड येथे असणाऱ्या इरसाल वाडी या अदिवासी वस्तीवर असणाऱ्या पाड्यावर दरड कोसळले. पूर्ण गाव झोपेत असतानाच गावावर दरड कोसळली. या घटनेत संपूर्ण गावच मलब्याखाली दबले गेले आहे. जवळपास 120पेक्षा अधिक लोक अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आत्तापर्यंत पाच ते सहा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. तर, २७ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. मात्र हे बाचवकार्य सुरु असतानाच एका अग्निशमन दलाच्या जवानावर मृत्यू ओढावला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इरशालवाडी येथे भूस्खलन झाल्याची माहिती मिळताच तातडीने बचावकार्य सुरु करण्यात आले. नवी मुंबई प्रशासनाची अग्निमशन गाडी आपल्या टीमसह घटनास्थळी पोहोचली. मात्र बचावकार्य सुरु असताना अनेक अडथळे येत होते. वादळी वारे आणि मुसळधार पाऊस असं अशतानाही जवान मोठ्या प्रय़त्नांनी गडावर चढून बचावकार्य करत होते. मात्र बचाव कार्य सुरु असतानाच एक दुर्दैवी घटना घडली. नवी मुंबई नगर नियमचे अग्निशमन दलाचे सहाय्यत केंद्रीय अधिकारी शिवराम धुमाणे यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. 


शिवराम यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना काही वेळ एका ठिकाणी विश्रांती घ्यायला लावली. मात्र त्यानंतरही त्यांवी तब्येत अधिकच खराब झाली. तेव्हा त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रस्त्यातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. कर्तव्याचे पालन करत असतानाच धुमाने यांचा मृत्यू झाल्याने सगळीकडे चिंता व्यक्त केली जात आहे. 


दरम्यान, गावापर्यंत पोहोचण्यासाठी फक्त एकच पायवाट. सध्या पावसामुळं तीसुद्धा निसरडी झाल्यामुळं बचाव कार्यात मोठे अडथळे येत आहेत. इरसालवाडीपर्यंत कोणतंही मोठं वाहन पोहोचू शकत नसल्यामुळं सध्या मानवी प्रयत्नांनीच ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. 


इरसालगड दुर्घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत गावकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. यावेळी परिस्थितीचं गांभीर्य पाहता त्यांनी मृतांच्या नातलगांना 5 लाख रुपयांची शासकीय मदत देण्याचं आश्वासनही दिलं. शिवाय जखमींवर सर्व उपचार सरकारी खर्चातून केले जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.