Matheran Garbett : इरसालवाडीच्या जखमा अद्यापही ताज्या असतानाच राज्यातील दरड दुर्घटना काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाही आहेत. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा दरड प्रवण क्षेत्रांमध्ये असणारी दहशत वाढली आहे. इरसालवाडीप्रमाणंच आणखी दुर्घटना घडू नयेत यासाठी प्रशासनाकडून दरड प्रवण क्षेत्रांतील नागरिकांना इशारा देण्यास सुरुवात केलेली असतानाच माथेरामनध्ये हादरवणारी घटना घडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक पर्यटकांच्या आकर्षणाचं आणि मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या गारबट वाडीमध्ये सध्या भीती पसरली आहे. या वाडीभोवती असणाऱ्या शेतांमध्ये लांबलचक भेगा पडल्या आहेत. साधारण 50 ते 100 फूट लांबीच्या या भेगा असून त्या 8 फूट खोल असल्याचं सांगण्यात आलं आहे. यामुळे गारबट वाडीतील जवळपास 35 ते 40 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. माथेरान नगरपालिकेच्या कम्युनिटी सेंटर हॉलमध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. 


पर्यटकांच्या आवडीचं ठिकाण, माथेरान...


माथेरानच्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या अनेक मंडळींचे पाय इथल्या गार्बेट पठाराच्या दिशेनं वळतात. भिवपुरी स्थानकापासून नजीक असणाऱ्या गावातून पठारासाठीचा ट्रेक सुरु होतो. साधारण 2625 फूट उंचीवर असणाऱ्या या टेकडीवजा पठारावर येत इथून सुरेख दृश्य आणि आजुबाजूचा परिसर न्याहाळता येतो. 


हेसुद्धा वाचा : Maharashtra Rain Updates : पुढील काही तास अतीवृष्टीचे; मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रासाठी 'रेड अलर्ट' 


उपलब्ध माहितीनुसार माथेरानच्या दक्षिण पश्चिमेला गार्बेटचं पठार आणि गार्बट वाडी आहे. हे ठिकाण 1850 मध्ये तत्कालीन ठाण्याचे जिल्हाधिकारी  Hugh Poyntz Malet यांनी शोधल्याचं म्हटलं जातं. पावसाळा आणि हिवाळ्यादरम्यान, मुंबई, कल्याण, ठाणे नजीकचे अनेक पर्यटक या भागाला हजेरी लावतात. 


असं असलं तरीही यंदाच्या वर्षी मात्र डोंगरउतारावर आणि डोंगराळ भागांमधील सर्वच ठिकाणांवर जाणाऱ्यांमध्ये राज्यात पावसामुळं सुरु असणाऱ्या दरड सत्राची दहशत पाहायला मिळत आहे. इरसालवाडीच्या दुर्घटनेमुळं हे दाहक वास्तव सध्या पाहायला मिळत आहे. 


इरसालवाडीतील मृतांचा आकडा वाढणार?


रायगडमधील इरसालवाडी दरड दुर्घटनेतील शोधकार्य काही दिवसांपूर्वी थांबवण्यात आलं. 19 जुलै रोजी दरड कोसळून झालेल्या इरसालवाडी दुर्घटनेत आतापर्यंत 27 मृतदेह हाती लागले तर, 57 जण बेपत्ता आहेत. आतापर्यंत 21 जणांना वाचवण्यात यश आले आहे. दरम्यान, दुर्घटनेतील बेपत्ता ५७ व्यक्तींना आज मृत घोषित केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.