Maharashtra Rain Updates : सोमवारपासून बरसणाऱ्या पावसानं अद्यापही मुंबईसह कोकण आणि राज्याच्या इतर भागांमध्ये उसंत घेतलेली नाही. परिणाम शहरातील नागरिकांनी लख्ख सूर्यप्रकाश पाहिलेलाच नाही. काळ्या ढगांची चादर मुंबई, ठाणे आणि पालघरवर अद्यापही कायम असून, पुढील काही दिवसांसाठी हेच चित्र पाहायला मिळेल असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. बुधवारी मुंबईत जवळपास 100 मिमी पर्जन्यमानाची शक्यता वर्तवण्यात येत असून त्या धर्तीवर ऑरेंज अलर्ट जारकी करण्यात आला आहे. त्यानंतरचे दोन दिवस तो यलो अलर्टमध्ये परावर्तित होईल. थोडक्यात घरातून बाहेर पडण्यापूर्वी पावसाची व्यवस्था करूनच निघणं उत्तम! 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे वेधशाळेचे महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार पुढील चार ते पाच दिवसांसाठी राज्याच्या बहुतांश घाटमाथ्यावरील भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळेल. तर, यासोबतच कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांना पावसाचा तडाखा बसणार आहे. पुढील काही तासांमध्येसुद्धा विदर्भाला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 


हेसुद्धा वाचा : पुण्यात ATS ची मोठी कारवाई, दोघे जण ताब्यात; लॅपटॉपमध्ये सापडली संशयास्पद माहिती


 




कोकण विभागात पावसामुळं यंत्रणा सतर्क 


कोकणातील बऱ्याच भागांमध्ये पावसाच्या सरी प्रचंड ताकदीनं कोसळत असल्यामुळं येथील नद्या, नाले ओसंडून वाहू लागले आहेत. तर, काही गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. सिंधुदुर्गातील बहुतांश सखल भाग पाण्याखाली गेले आहेत. तर, सततच्या पावसामुळं कुडाल तालुक्यातील जवळपास 27 गावांशी संपर्क तुटल्याची माहिती समोर येत आहे. 


तिथं रायगड जिल्ह्यातही परिस्थिती वेगळी नाही. पालघर, ठाणे आणि रायगड भागात बुधवारी अतिमुसळधार पावसाची हजेरी असू शकते. त्यामुळं या भागांना हवामान विभागानं रेड अलर्ट देत सतर्कतेचा इशारा दिला आहे. अलिबागमध्येही पावसाची जोरदार हजेरी पाहता येणार असून, समुद्रकिनारी भागांमध्ये न जाण्याचं आवाहन यंत्रणा करताना दिसत आहेत.