राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.४२ टक्के
महाराष्ट्र राज्यात (Maharashtra) काल दिवसभरात कोरोनाचे (CoronaVirus) ४ हजार २६ नवे रुग्ण आढळून आलेत.
मुंबई : राज्यात (Maharashtra) काल दिवसभरात कोरोनाचे (CoronaVirus) ४ हजार २६ नवे रुग्ण आढळून आलेत. काल दिवसभरात ६ हजार ३६५ रुग्णांनी कोरोनावर मात केलीये. सध्या राज्यात एकूण ७३ हजार ३७४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९३.४२ टक्के इतके झाले आहे.
राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यात चांगलेच यश येताना दिसत आहे. ६ हजार ३६५ करोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत १७ लाख ३७ हजार ८० रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. दरम्यान, थंडीचे दिवस असल्याने प्रत्येकाने काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. हात साबणाने धुणे, तोंडाला मास्क लावणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे, असे आवाहन करण्यात आले आहे. काल राज्यात ४ हजा २६ नवे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये ५३ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा २.५७ टक्के इतका झाला आहे.
पुणे, मुंबईत कोरोना पॉझिटिव्हीटीचा रेट कमी
पुणे शहरात आठवड्याचा पॉझिटिव्हीटीचा रेट दहाच्या खाली आला आहे. डिसेंबरच्या सुरुवातीला दुसऱ्या लाटेची शक्यता असल्याचा अंदाज लावला जात असतांना आठवड्याच्या अकडेवारीनं दिलासा दिला आहे. बाहेरून येणाऱ्या रुग्णांना कोरोनाची चाचणी बंधनकारक असल्यानं त्याचा परिणाम आकडेवारीवर आला आहे.
पाच हजार रुग्ण अॅक्टिव्ह असून त्यातील साडेतीन हजार रुग्ण होम आयसोलेट आहे. लग्नसराईचे दिवस आल्यानं नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. तसेच मुंबई शहरातील कोरोना पॉझिटिव्ह दर आता हळूहळू खाली आला आहे. दरम्यान, दिवाळीनंतर पश्चिम उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणात नोंद झाली असून, मुंबईतील ४८ टक्के केसेस हे पश्चिम उपनगरातील आहेत.