Maharashtra Weather Forecast Update : राज्यात पुढील 4 दिवस या जिल्ह्यात पावसाची शक्यता
Maharashtra Weather : राज्याच्या काही भागांत जोरदार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. पुढील 4 दिवसांत अनेक जिल्ह्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच 28 एप्रिलपर्यंत देशाच्या पूर्व भागात गडगडाटसह पाऊस पडेल अशी शक्यता आहे.
Maharashtra Weather Forecast Update : राज्याच्या काही भागांत ढगांच्या गडगडाटसह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. पुढील 4 दिवसांत अनेक जिल्ह्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईसह कोकण आणि उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच 28 एप्रिलपर्यंत देशाच्या पूर्व भागात गडगडाटसह पाऊस पडेल अशी शक्यता आहे. दुसरीकडे, उत्तर पश्चिम आणि पश्चिम मध्य भारताच्या तापमानात हळूहळू वाढ होऊ शकते, परंतु उष्णतेची लाट येणार नाही, असा अंदाज आहे.
30 ते 40 किमी ताशी वेगाने वारे
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांत यलो अलर्ट जाही करण्यात आला आहे. या ठिकाणी जोरदार वारे वाहतील. त्याचवेळी पाऊसही पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तसेच सिंधुदुर्गात तुरळक पावसाची शक्यता आहे. धुळु, नंदुरबार, जळगाव, नाशिक या ठिकाणी जोरदार वारे वाहतील. नाशिक वगळता 30 ते 40 किमी ताशी वेगाने वारे वाहतील तसेच जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच कोल्हापूर आणि सांगली येथेही वाऱ्यासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. साताऱ्यात काही ठिकाणी तुरळ पावसाचा अंदाज आहे.
एप्रिल महिना संपत आला तरी तापमानाचा पारा वाढलेलाच आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून उत्तर मैदानी भाग, मध्य, पूर्व, ईशान्य आणि दक्षिण भारताच्या काही भागात मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. या पावसाने देशातील उष्णतेच्या लाटेचा प्रभाव बऱ्याच अंशी संपला आहे. खासगी हवामान एजन्सी स्कायमेटच्या मते, 28 एप्रिलपासून कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, दक्षिण राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या पश्चिम भागातही पाऊस सुरु होऊ शकतो. हा पाऊस हळूहळू देशातील बहुतांश भाग व्यापेल.
मे महिन्यातील हवामानाबाबतही मोठा अंदाज वर्तवला आहे. गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत यंदा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस अधिक असल्याचे दिसते. मे हा वर्षातील सर्वात उष्ण महिन्यांमध्ये गणला जातो. परंतु सततच्या पावसाच्या या हालचालींमुळे लोकांना उष्णतेची लाट आणि उष्ण हवामानापासून मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल. मात्र, यामुळे गहू आणि मोहरी पिकांच्या काढणीसाठी त्रासदायक ठरणार आहे.
या राज्यात हलका ते मध्यम पाऊस
पुढील 24 तासांत तामिळनाडू, केरळ, दक्षिण भारत कर्नाटक, तेलंगणा, विदर्भ, आंध्र प्रदेश आणि ओडिशा या भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. एक-दोन ठिकाणी मुसळधार पावसाचीही शक्यता आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये मेघगर्जनेसह हलका पाऊस पडू शकतो.