Maharashtra weather : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अवकाळी पावसानं माजवलेला हाहाकार महाराष्ट्रानं अनुभवला. किंबहुना अद्यापही राज्यातील काही जिल्ह्यांमधून अवकाळीनं पाठ फिरवलेली नाही. त्यातच म्हणे आता सातारा भागात थंडीचा कडाका वाढू लागला आहे. नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये काही दिवसांपासून किमान तापमानात घट नोंदवली जात आहे. इथं थंडीचा कडाका वाढत असल्यामुळं महाबळेश्वर शहरासह तालुक्यात अचानकच हिवाळाच सुरु असल्याचं जाणवत आहे. (Maharashtra weather Mahabaleshwar satara vitnessed lowest temprature latest Marathi news )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाबळेश्वरमध्ये थंडी वाढल्यानं पहाटे वेण्णालेकसह लगतच्या परिसरात दवबिंदूचे हिमकणात रूपांतरण झाल्याचं दृश्य पाहायला मिळालं. वेण्णालेक जेट्टीसह वेण्णालेक परिसरातील वाहनांच्या टपांवर देखील मोठ्या प्रमाणावर हिमकण जमा झाल्याचं पहायला मिळालं. 


वाई, पाचगणी, महाबळेश्वर, भोसे या भागांमध्ये तापमानात झालेली घट पाहता इथल्या वातावरणाचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटकांनी आता साताऱ्याचीच वाट धरली आहे. ज्यामुळं या आठवड्याच्या अखेरीस सुट्ट्यांच्या निमित्तानं इथं मोठ्या प्रमाणात पर्यटकांची रीघ दिसल्यास आश्चर्य वाटायला नको. 



राज्यात तापमान वाढणार... 


एकिकडे साताऱ्यात थंडी वाढत असतानाच विदर्भ वगळता उर्वरित राज्यात येत्या काळात उन्हाळा वाढणार असल्याची माहिती हवामान विागानं दिली आहे. गडचिरोली, नागपूर, गोंदिया इथं पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, राज्याच्या उत्तर आणि पश्चिम भागात तापमानात लक्षणीरित्या वाढ होणार आहे. 


हेसुद्धा वाचा : Kedar Jadhav Father : बेपत्ता झाल्याच्या काही तासांनंतर केदार जाधवचे वडील सापडले


मुंबई, कोकण, मराठवाडा या भागात कमाल तापमानात वाढ होऊन उन्हाचा दाह आणखी जास्त प्रमाणात जाणवण्यास सुरुवात होणार आहे. एप्रिल आणि मे महिन्यामध्ये तापमानाचा आकडा वाढलेलाच असू शकतो. यादरम्यान अनेकांना उष्माघाताचा धोकाही संभवतो. त्यामुळं शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवण्यासाठी पुरेसं पाणी प्या आणि उन्हाळ्यापासून स्वत:चं संरक्षण करा असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात येत आहे. 


उष्णतेच्या लाटा येणार... 


इंटरगव्हरमेंटल पॅनेल ऑफ क्लायमेट चेंजकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालातून सर्वांचं लक्ष वेधणारा इशारा देण्यात आला आहे. जागतिक पातळीवर तापमान वाढ होत असल्यामुळे उष्णतेच्या लाटा वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. सातत्यानं होणाऱ्या तापमान वाढीमुळं येत्या काळात उष्णतेच्या लाटा वाढू शततात. याचे परिणाम किनारपट्टी भागामध्ये अधिकाधिक दिसून येणार आहेत. इतकंच नव्हे तर, या शतकाअखेर समुद्राच्या पातळीतही 1.1 मीटरने वाढ होण्याची शक्यता आहे.