Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यातील बहुतांश भागांमध्ये सध्या तापमानात मोठे चढ- उतार पाहायला मिळत असून, फेब्रुवारीच्या अखेरीपासून सुरु झालेला उकाडा काही केल्या राज्यातून काढता पाय घेताना दिसत नाहीय. असं असलं तरीही राज्याच्या काही भागांमध्ये मात्र मागील 48 तासांमध्ये हवामानात काही अनपेक्षित बदलांची नोंद करण्यात आली आहे. तिथं पुण्यामध्ये बुधवारी तापमानात अचानक 9 ते 10 अंशांची घट नोंदवण्यात आली, ज्यामुळं इथं अचानक गारठा जाणवू लागला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकिकडे पुणे आणि नजीकच्या काही भागांसह सातारा, सांगली पट्ट्यामध्ये हवेत गारठा जाणवणार असतानाच गेल्या 24 तासांत मुंबईतही चित्र वेगळं नव्हतं. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये तापमानात घट पाहायला मिळाली असली तरीही उष्मा मात्र कमी न झाल्यानं नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला नाही.


पुढील 24 तासांमध्येही राज्यात काहीशा अशाच हवामानाचा अंदाज आहे. राजस्थानातील चुरू येथे तापमानानं पन्नाशी गाठली असतानाच विदर्भापर्यंत त्याचे परिणाम दिसून येत आहेत. जिथं चंद्रपूर भागाला उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये मात्र काही क्षेत्रांमध्ये उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 


विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता असतानाच दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील ठराविक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यादरम्यान ताशी 40 ते 50 किमी वेगानं वारे वाहण्याचाही अंदाज आहे. मुंबई, पालघर, ठाणे भागांमध्ये आकाश अंशत: ढगाळ राहणार असून, दमट हवामान राहील असं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे. 


महाराष्ट्रापासून मान्सून किती दूर? 


आयएमडीनं नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार पुढील काही तासांमध्ये मान्सून केरळमध्ये धडकणार आहे. प्राथमिक अंदाजान्वये मान्सूनच्या केरळमधील आगमनाची तारीख 31 मे होती. पण, तो त्याआधीसुद्धा दक्षिणेकडील या राज्यात हजेरी लावण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 


हेसुद्धा वाचा : मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर 63 तासांचा मेगाब्लॉक, 930 लोकल रद्द, वेळापत्रक वाचा


 


सध्या मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण असून, पुढच्या चार दिवसांमध्ये महाराष्ट्रातही पावसाची हजेरी पाहायला मिळेल. पण, हा मान्सून नसेल याची मात्र नोंद घ्यावी. महाराष्ट्रात येण्याआधी मान्सून अरबी समुद्राचं बहुतांश क्षेत्र, मालदीवचा उर्वरित भाग आणि केरळची भूमी व्यापणार असून, त्यानंतर तो पुढे कूच करताना दिसेल. दरम्यान त्याआधी काळ्या ढगांची दाटी पाहायला मिळणार असली तरीही प्रत्यक्षात महाराष्ट्रात मान्सून 10 जूनपर्यंत येण्याचीच शक्यता कायम आहे.