Maharashtra Weather News : ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर पावसानं जणू दडीच मारली. अधूनमधून येणारी एखादी सर वगळता राज्याच्या इतर भागांमधून पावसानं काढता पाय घेतला की काय? हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करून गेला. मुंबई शहर आणि उपनगरांसह मध्य आणि उत्तर महाराष्ट्रातही हेच चित्र. तर, पश्चिम महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर होणारी ढगांची गर्दी वगळता इतर भागांमध्येही पावसानं दडी मारल्याचं पाहायला मिळालं. सध्या देशभरात मान्सूननं उघडीप दिली असली तरीही महिनाअखेरीस पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इथं पाऊस उघडिप देत असतानाच तिथं राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानवाढीस सुरूवात झाली आहे. कोकण किनारपट्टी क्षेत्रांमध्येही येत्या दिवसांमध्ये हवेतील आर्द्रता वाढून उकाडा आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार मुंबईचाही पारा काहीसा वाढलेलाच पाहायला मिळेल. थोडक्यात राज्यात तूर्तात ऊन- सावल्यांचाच खेळ पाहायला मिळणार हे अटळ. पावसानं माघार घेतल्यामुळं तापमानाच होणारी वाढ पाहता उष्णतेच्या या झळा काही साथीच्या आजारांनाही बोलावणं पाठवू शकतात. त्यामुळं हा उकाडा चिंता वाढवतोय हे नाकारता येत नाही.


हेसुद्धा वाचा : रत्नागिरितील देउडमधील कातळशिल्प अखेर संरक्षित स्मारक; या कातळशिल्पात नेमकी कसली चित्र


दरम्यान, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि मध्यम स्वरुपातील पावसाची हजेरी असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्याच्या घडीला गुजरात आणि नजीकच्या भागावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, त्याचे परिणाम महाराष्ट्राच्या काही भागांवर दिसून येत आहेत. परिणामी मध्य भारत, गुजरात आणि महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरींची शक्यता नाकारता येत नाही. 


परतीच्या प्रवासाआधी मान्सून महाराष्ट्रात सरासरी किती टक्के बरसला?


यंदाच्या वर्षी राज्यात सरासरीपेक्षा 27 टक्के अधिक पाऊस पडला आहे. संपूर्ण देशाची सरासरी पाहता यंदा सरासरीपेक्षा पाच टक्के अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. तमिळनाडूत सरासरीहून 92 टक्के आणि पुदुचेरीमध्ये 86 टक्के जास्त पावसाची नोंद झाली. आश्चर्याची बाब म्हणजे सरासरीपेक्षा जास्त पाऊस लडाखसह सिक्कीम, राजस्थान, गोवा, दिल्ली, आंध्र प्रदेश, कर्नाटकमध्ये पडला.