Maharashtra Weather News : डिसेंबर महिन्याची सुरुवात झाली आणि जिथं थंडीनं आणखी जोर धरणं अपेक्षित होतं तिथंच अचानकत ही थंडी दडी मारताना दिसत असल्यामुळं या हवामान बदलानं सर्वांचीच चिंता वाढवली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या फेंगल चक्रीवादळामुळं ही प्रणाली पूर्णपणे बदलली असून, हिवाळ्याच्या दिवसांमध्ये राज्यावर पावसाचे ढग घोंगावताना दिसत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्याच्या बहुतांश भागांमध्ये किमान तापमानाचा आकडा 14 अंशांहून अधिक असून, दक्षिण महाराष्ट्रासह पश्चिम पट्ट्यावर या चक्रीवादळाचे परिणाम दिसून येत आहेत. उत्तर महाराष्ट्र मात्र पावसाला अपवाद असून, इथं थंडीचा कडाका कायम असल्याचं स्पष्ट होत आहे. राज्यातील निच्चांकी तापमानाची नोंद धुळ्यात करण्यात आली असून इथं हा आकडा 7 ते 8 अंशांदरम्यान असून, सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद रत्नागिरी इथं करण्यात आली आहे. जिथं तापमानाचा आकडा 34 अंशांवर असल्याचं पाहायला मिळालं. पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या बहुतांश भागांमध्ये हवामानाची स्थिती स्थिर राहणार असून, मुंबई शहर आणि उपनगरांमधील गारठा कमी होणार आहे, तर उत्तर महाराष्ट्र गारठणं सुरूच राहणार आहे. 


कोकण किनारपट्टी क्षेत्रावर दमट हवामानाच वाढ होणार असून, येथील काही भागांवर पावसाळी ढगांचं सावट पाहायला मिळणार आहे. दरम्यानच्या काळात बंगालच्या उपसागरावरून वाहणारे हे वारे अरबी समुद्राच्या दिशेनं जाताना त्यांची तीव्रता आणखी कमी होऊन त्यानंतरच राज्यातील हवामानात सुधारणा अपेक्षित असल्याचं सांगण्यात येत आहे. 


थंडीचा कडाका कमी होणार 


सहसा डिसेंबर महिन्यापासून देशभरात थंडीचा कडाका वाढतो. पण, यंदाच्या वर्षी मात्र ही परिस्थितीची काहीशी वेगळी असल्याचं पाहायला मिळत आहे. आयएमडीच्या वृत्तानुसार डिसेंबर महिन्यात अपेक्षित तापमान घट नोंदवली जाणार नसून, एकंदरच हिवाळ्यादरम्यान म्हणजे डिसेंबर ते फेब्रुवारीच्या काळात अपेक्षित प्रमाणात शीतलहरी निर्माण होणार नसल्यामुळं यंदाची थंडी बेताचीच असेल. 


हेसुद्धा वाचा : 23 विमानतळं असलेले भारतातील एकमेव राज्य, नाव ऐकून शॉक व्हाल, 5 इंटरनॅशनल आणि 18 डोमॅस्टिक एअरपोर्ट


 


समाधानकारक हिवाळ्यासाठी महत्त्वाची असणारी ला निना प्रणाली सतत हुलकावणी देत असल्यामुळं आता ही प्रणाली सक्रीय केव्हा होते याकडेच हवामान विभागाचं लक्ष लागलं आहे. देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा जोर काही अंशी कमी झाल्यामुळं याचा परिणाम आणि तिथून चक्रीवादळाचा परिणाम या साऱ्यामुळं महाराष्ट्रातील किमान तापमानात वाढ होत असल्याची बाब निदर्शनास येत आहे.