Weather Update : कमी दाबाच्या पट्ट्यामुळं राज्याच्या `या` भागात ढगाळ वातावरण तर, `इथं` पावसाच्या सरी
Maharashtra Weather Update : दिवाळी तोंडावर आली तरीही राज्यातील हवामान काही एका ठिकाणी स्थिर असल्याचं पाहायला मिळत नाहीये.
Maharashtra Weather Update : हिवाळा ऋतू सुरु झाला असला तरीही सध्या त्याची अनुभूती मात्र राज्याच्या फार कमी भागांमध्ये पाहायला मिळत आहे. मान्सूननं माघार घेतल्यानंतर राज्यात मुंबईसह (Mumbai Weather) कोकण किनारपट्टी क्षेत्रांमध्ये तापमानाच लक्षणीय वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. हवेतील आर्द्रतेमुळं उष्णतेचा दाह आणखी जाणवू लागला. पण, विदर्भ मात्र याला अपवाद ठरला. कारण, इथं मात्र थंडीची चाहूल लागल्याचं स्पष्ट झालं.
हवामान विभागाच्या माहितीनुसार मागील काही दिवसांपासून राज्यात तापमानात मोठे बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. थोडक्यात हिवाळ्याच्या दिवसांमध्ये काही जिल्ह्यांना पावसाचा मारा सोसावा लागत आहे, तर कुठं उन्हाच्या झळा काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. त्यातच सध्याच्या घडीला पश्चिमी झंझावात सक्रिय असल्यामुळंही महाराष्ट्रात पर्जन्यमानाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागानं नोंदवली आहे.
हेसुद्धा वाचा : हा तर लॉकडाऊन! मुंबईकरांचा मॉर्निंग वॉक, व्यायाम बंद; सणासुदीच्या दिवसांत दारं- खिडक्या बंद ठेवण्याच्या सूचना
गेल्या काही दिवसांपासून अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. ज्यामुळं वातावरणात सातत्यानं काही बदल होताना दिसत आहेत. फक्त महाराष्ट्र नव्हे, तर देश पातळीवरही हे बदल पाहायला मिळत असून याचे परिणाम तामिळनाडूमध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या स्वरुपात पाहायला मिळाले. तिथं कर्नाटक आणि गोव्यावरही पावसाचं सावट असल्यामुळं आता ऐन हिवाळ्यात चर्चा सुरुये ती म्हणजे पावसाचीच.
राज्याच्या कोणत्या भागात पावसाची हजेरी?
हवामान विभागानं सद्यस्थिती पाहत वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या काळात महाराष्ट्रातील (Konkan, Kolhapur, satara) कोल्हापूर, सातारा, सांगली या भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाची हजेरी असेल. मधूनच पावसाचा जोरही वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तिथं पुण्यामध्ये आणि नवी मुंबई, पालघरमध्ये वातावरण काहीसं ढगाळ असून, उकाडा वाढल्याचं जाणवेल.
उत्तरेकडील राज्यांमध्येही पाऊस अडचणी वाढवणार
देशातील दक्षिण भाग आणि महाराष्ट्रासह राजस्थान, पंजाबमध्येही पुढच्या दोन दिवसांत पावसाच्या तुरळक सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हेसुद्धा पश्चिमी झंझावाताचेच परिणाम असून, 10 नोव्हेंबरपर्यंत असंच चित्र पाहायला मिळू शकतं. ज्यामुळं दक्षिण द्वीपकल्पीय भागामध्ये ऑरेंज अलर्टही देण्यात आवा आहेत. तामिळनाडूमध्ये अतिवृष्टी होऊन पुन्हा अडचणी वाढण्याचा अंदाज आहे.
तिथं (Uttarakhand, Himachal Pradesh, Jammu Kashmir) उत्तराखंड, हिमाचल, गिलगिट, बाल्टीस्तान, लडाख आणि जम्मू काश्मीर भागांमध्येही मैदानी क्षेत्रांवर पावसाच्या सरींची बरसात होणार असून, कडाक्याच्या थंडीत पावसामुळं तामानात आणखी घट नोंदवली जाणार आहे. त्यामुळं या भागांमध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांनीही हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच पुढील प्रवासाची आखणी करावी.