Monsoon in Maharashtra Latest Updates: दोन दिवसांपूर्वीच केरळमध्ये पावसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे आता मुंबईत पाऊस कधी येणार असा विचार मुंबईकरांच्या मनात येत आहे. हवेतील आर्द्रतेमुळे वातावरणात झपाट्याने बदल होत असून, त्यामुळे मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सामान्यतः मान्सून केरळमध्ये 1 जून रोजी पोहोचतो, परंतु यावेळी तो 30 मे रोजी दाखल झाला आहे. केरळमध्ये पोहोचल्यानंतर आता मान्सून कर्नाटक, रत्नागिरी, सिंधुदुर्गमार्गे गोव्यातून मुंबईत दाखल होणार आहे. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी 10 दिवस लागतात. वाऱ्याचा वेग जसा बदलेल तसा मान्सूनचा वेगही बदलणार असल्याच हवामान खात्याने म्हटलं आहे. 


येणाऱ्या दिवसांत तापमानात बदल 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर वेळे अगोदर पाऊस मुंबईत दाखल झाला तर भीषण गरमीपासून मुंबईकरांना दिलासा मिळेल. गुरुवारी मुंबईचे तापमान 35 डिग्री असल्याची नोंद झाली. तर आर्द्रता 80% ते 90% नोंदवली गेली. आर्द्रतेमुळे येत्या काही दिवसांत तापमान कमी राहणार असले तरी उष्णतेची लाट कायम राहणार आहे. हवेतील आर्द्रता हा मान्सूनसाठी अनुकूल वातावरण निर्माण करणारा महत्त्वाचा घटक आहे.



रेमलचा मान्सूनवर परिणाम 


IMD ने यापूर्वी 31 मे पर्यंत मान्सून केरळमध्ये पोहोचण्याचा अंदाज वर्तवला होता, परंतु चक्रीवादळ रेमलमुळे, मान्सून वेगाने पुढे गेला आहे आणि केरळ आणि ईशान्य भारताच्या बहुतेक भागात वेळेपूर्वी पोहोचला आहे. यंदाच्या पावसाळ्यात सामान्य पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.


मान्सूनचा पॅटर्न बदलत राहतो 


'मान्सूनचा पॅटर्न कधीच सारखा नसतो', अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे प्रादेशिक उपमहासंचालक सुनील कांबळे यांनी दिली. पुढे ते म्हणाले की, मान्सूनचा पॅटर्न दरवर्षी सारखा नसतो. पर्यावरणीय परिस्थितीनुसार ते बदलते. केरळमध्ये ज्याप्रमाणे मान्सून वेळेआधी दाखल झाला आहे, त्याचप्रमाणे मुंबईतही मान्सून निर्धारित वेळेपूर्वी दाखल होऊ शकतो.


मान्सून पुढे कसा सरकेल ?


येत्या दोन-तीन दिवसांत दक्षिण-पश्चिम मान्सूनचा आणखी विस्तार होण्यास अनुकूल परिस्थिती असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. या भागात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.


  • मध्य अरबी समुद्राचे इतर काही भाग.

  • दक्षिण अरबी समुद्राचे उर्वरित भाग.

  • लक्षद्वीप प्रदेश आणि केरळचा काही भाग.

  • कर्नाटकातील काही भाग.

  • तामिळनाडूचे इतर काही भाग.

  • दक्षिण-पश्चिम आणि मध्य बंगालचा उपसागर.

  • ईशान्य बंगालच्या उपसागरातील उर्वरित भाग.

  • आसाम आणि मेघालय.

  • पश्चिम बंगाल आणि सिक्कीमचे उप-हिमालयी भाग.


आठवड्याच्या उर्वरित दिवसांमध्ये, नैऋत्य मान्सून दक्षिण भारताच्या उर्वरित भागांमध्ये आणि पूर्व भारतातील आणखी काही भागात पसरू शकतो.