सतीश मोहीते, झी मीडिया, नांदेड :  साडेतीन शक्तीपीठांपैकी पूर्ण शक्तीपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माहूर गडाच्या पायथ्याशी जवळपास २० फुटांवर पाण्याचे झरे आढळले आहेत. एका पुरातन कुंडांच्या साफसफाईचं काम करत असतेवेळी, उन्हाचा दाह वाढत असतानाच हे पाण्याचे झरे लागले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देवीचं शक्तीपीठ असणाऱ्या या परिसरातील सर्व पुरातन कुंड शोधुन त्यांचं पुनरुज्जीवन करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यातील माहुरगडापाशी पायथ्याशी आणि आसपासच्या परिसरात जवळपास १८० पुरातन कुंड आहेत. पण, काळाच्या ओघात त्यातील बरीच नामशेष झाली आहेत. काही कुंडांचा वापर हा नागरिकांनी कचरा कुंड्यांसाठी केला होता.


माहूर येथे गायनासाठी आलेल्या पद्मश्री अनुराधा पौडवाल यांना ही बाब समजताच आणि सुर्योदय फाऊंडेशन तसेच रेणुका देवी संस्थानच्या पुढाकाराने हे कुंड पुनरुज्जीवीत करण्याचा कामाला सुरुवात झाली. माहुर आणि इतरही ठिकाणच्या नागरिकांनी  श्रमादानास सुरुवात केली. गेल्या दीड महिण्यापासुन हे काम सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. कुंडांच्या स्वच्छतेचं काम सुरु असतानाच रुणमोचन कुंड आणि काशिकुंडांमध्ये २० फुटांवर पाण्याचे झरे सापडले. कुंडात खोलवर पाणि लागल्याने सर्वांचा उत्साह आणखी वाढला आहे. 



परिणामी या परिसरातील उर्वरित कुंड शोधुन त्यपैकी अधिकाधीक कुंड पुन्हा जिवीत करण्याचा निर्धारही नागरिकांनी केला आहे. यासाठी खुद्द गायिका अनुराधा पौडवाल यांनीही मदतीचा हात पुढे केल्याचं कळत आहे. त्यांनी नांदेड जिल्ह्यातील १० गावांतील जलसंधारणाची कामं हाती घेतली आहेत हीसुद्धा एक प्रशंसनीय बाब आहे.  पुरातन काळातील अनेक कुंड आज नामशेश होण्याचा मार्गावर आहेत. पण, या कुंडांचे पुनरुज्जीवन केल्यास पाण्याचे चांगले स्त्रोत नक्कीच उपलब्ध होतील शिवाय एतिहासीक वारसा जपण्यासही मदत होईल हेसुद्धा तितकच खरं.