सांगली: हरिपूर रस्त्यावर शनिवारी रात्री एका भरधाव ट्रकने सहा वर्षांच्या मुलीला चिरडल्याची घटना घडली. यानंतर संतप्त जमावाने केलेल्या मारहाणीत ट्रकच्या क्लिनरचा मृत्यू झाला. येथील लिंगायत स्मशानभूमीच्या परिसरात रात्री साडेअकरा वाजता ही घटना घडली. या अपघातात सहा वर्षांच्या ऋचा झेंडे हिचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोन जण जखमी झाले आहेत. या प्रकारानंतर संतप्त जमावाने ट्रक वाहक कुमार आडगेकर (वय ४५, रा. हरिपूर) याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. ट्रकचालक फरार झाला. यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. सांगली शहर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हरिपूर रस्ता काळीवाट येथे बालिका ऋचा आपल्या कुटुंबियांसमवेत राहते. रात्रीच्या सुमारास काका संदीप झेंडे यांच्या बरोबर गाडीवरून घरी निघाली होती. येथील काळीवाट चौकात गाडी वळण घेऊन घरी जात होती. त्यावेळी हरिपूरातील ट्रक चालक भरधाव वेगाने गाडी घेऊन निघाला होता. चालकाला वेग नियंत्रित न करता आल्याने त्याने दुचाकीला उडविले. 


या जोरदार धडकेमुळे ऋचा पुढच्या रस्त्यावर आदळली. तर संदीप झेंडे दुसर्‍या बाजूला पडले. यानंतरही ट्रकचा वेग कायम होता. काही अंतरावर जाऊन ट्रकने आणखी एकाला उडवले. यानंतर ट्रक पुढच्या कमानीवर धडकून रस्त्याकडेला जाऊन थांबला. हा प्रकार समजताच तेथील जमावाने ट्रक वाहकाला गाडीतून खाली खेचले आणि बेदम मारहाण केली. 


यादरम्यान तेथील तरुणांनी गंभीर जखमी झालेल्या ऋचाला सांगली सिव्हिलमध्ये उपचारासाठी दाखल केले. परंतु  तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. ऋचाचा मृत्यू झाल्याचे समजताच संतप्त जमावाने वाहक कुमार आडगेकर याला आणखी बेदम मारहाण केली. त्यामध्ये तो बेशुद्ध झाला. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी जमावाला हटवून कुमारला सांगली सिव्हिल मध्ये उपचारासाठी दाखल केले. परंतु त्याचाही उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.