बारामती: आघाडी सरकारच्या काळात आरक्षणाच्या ५२ टक्के मर्यादेला धक्का न लागू न देता मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले होते. मात्र, भाजप सरकारकडून ते पुढे टिकविण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सांगितले. ते शुक्रवारी बारामतीत पत्रकारांशी बोलत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी अजित पवार यांनी म्हटले की, आघाडी सरकार असताना मराठा समाजाला १६ टक्के व मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षण दिले होते. हे आरक्षण देताना ५२ टक्के आरक्षणाला आम्ही धक्का लागू दिला नाही. त्यावेळेस नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती, त्यावेळेसच्या चर्चेनुसार मराठा समाजाला नोकरी व शिक्षणासाठी आरक्षण हवे आहे असून राजकीय आरक्षण नको, असे सांगितल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले. 


मराठा आरक्षण पुढे टिकविण्यासाठी भाजप सरकारकडून पुरेसे प्रयत्न झाले नाहीत. चांगले वकील दिले असते, कायदेशीर बाबी तपासल्या असत्या तर आजची वेळ आली नसती.


सरकारने मराठा आरक्षणप्रश्नी सतरा महिने म्हणणेच मांडले नाही. वेळीच निर्णय घेतला असता तर मराठा तरुण-तरुणींच्या आत्महत्या झाल्या नसत्या. सरकारने आता तरी गांभिर्याने विचार करावा अन्यथा त्यांना मोठ्या परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही अजित पवारांनी दिला.