Devendra Fadnavis On Manoj Jarange Patil:  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणार मनोज जरांगे-पाटील यांनी रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात केलेल्या वादग्रस्त विधानांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलेच तापले. याच आरोपांवर आता देवेेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडली आहे. ही भूमिका मांडताना फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आणि विद्यमान राज्यसभा खासदार शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख केला आहे.


जरांगेच्या टीकेवर काय बोलले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनोज जरांगे पाटील यांनी याच आठवड्यात गेलेल्या गंभीर आरोपांमध्ये अगदी फडणवीस यांनी विषप्रयोग करण्याचा प्रयत्न केला इथपासून ते अगदी 'बामनी कावा' यासारखे जातीवाचक वादग्रस्त शब्द पवार टीका केली होती. 'बाजी तर फडणवीसांवर पलटली तर बामनी कावा संपला अन् फडणवीसही संपला', असा एकेरी उल्लेख करत मागील रविवारी जरांगेंनी टीका केली होती. जरांगेंनी केलेल्या गंभीर आरोपांबद्दल फडणवीस यांना एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमामध्ये प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी जरांगे हे फार नवीन आहेत असं म्हटलं. “मी उपाशी असल्याने माझा ताबा सुटला असं जरांगे म्हणाले. सोडून द्या. जरांगे तर बिचारे नवीन आहेत," असं फडणवीस म्हणाले.


थेट पवारांचा उल्लेख


मात्र पुढे बोलताना फडणवीस यांनी थेट शरद पवारांवर निशाणा साधला. "जेव्हा काही सापडत नाही तेव्हा शरद पवारही जातीवर जातात. संभाजीराजेंना तिकीट दिलं त्यावेळी त्यांनी पूर्वी छत्रपती पेशवे नेमायचे आता पेशवे छत्रपती नेमत आहेत, असं पवार म्हणाले होते. त्यांना माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावता येत नाही त्यामुळे जातीवरून आरोप होतात. पण आता महाराष्ट्र जातीपातीत अडकणार नाही,” असं म्हणत फडणवीसांनी थेट पवारांवर टीका केली.


मला कोण प्रमाणपत्र देणार?


आपल्याला जातीवरुन लक्ष्य केलं जातंय याकडे फडणवीस यांनी पुन्हा एकदा लक्ष वेधलं. “मी मागेही बोललो होतो की माझी जात लपली नाही. मी ती लपवून ठेवली नाही. मला त्यात अपराधी वाटत नाही. तसं असण्याचं कारण नाही," असं फडणवीस म्हणाले. "माझी जात मागे टाकून महाराष्ट्राने मला स्वीकारलं आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक समाजाने मला स्वीकारलं आहे. मला कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. महाराष्ट्राने स्वीकारलं असून कोण मला प्रमाणपत्र देऊ शकतं? कुणाला हा अधिकार आहे प्रमाणपत्र द्यायचा?" असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला.


माझी क्षमता असेपर्यंत...


पुढे बोलताना फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विधानाचा संदर्भ दिला. "शिंदे (मुख्यमंत्री) म्हणाले ते योग्यच आहे की महाराष्ट्राने मला स्वीकारलं असल्याने मी राज्यातील प्रत्येक समाजासाठी लढणार आहे. एखाद्या व्यक्तीने शिव्या दिल्या म्हणून मी थांबणार नाही. माझी क्षमता असेपर्यंत मी काम करणार आहे”, असं देवेंद्र फडणवीस जातीपातीच्या राजकारणावरुन निशाणा साधताना म्हणाले.