मराठा वादळ मुंबईत धडकणार! `ट्रॅप रचणाऱ्यांबाबत गौप्यस्फोट करणार` जरांगेंची घोषणा
Manoj Jarange Mumbai Morcha: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज मुंबईच्या दिशेने निघालाय. मराठा मोर्चा पुण्यात दाखल झाल असून आज लोणावळ्यात मुक्काम आहे. पुण्यात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे.
Maratha Reservation Mumbai Morcha : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस आहे. जरांगे आज पुण्यातल्या खराडीमधून लोणावळ्याकडे रवाना होतील. पिंपरी-चिंचवडमार्गे मराठा आंदोलक (Maratha Samaj) लोणावळ्यात दाखल होतील. रात्रीचा मुक्काम लोणावळा गावात होईल. लोणावळ्यात सगळ्यांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) कोणताही तोडगा न निघाल्याने मनोज जरांगे पाटील मुंबईतल्या आंदोलनावर ठाम आहेत...
'मुंबईकडे निघाला मराठ्यांचा मोर्चा सरकार सांभाळा तुमच्या खुर्च्या'असा इशारा देत कोल्हापुरातील मराठा कार्यकर्ते मंबईच्या दिशेनं रवाना झालेत. शाहीर दिलीप सावंत यांनी पोवाड्याच्या माध्यमातून सरकारला इशाराच दिलाय. मनोज जरांगे यांनी पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरातून मराठा कार्यकर्ते मुंबईकडे निघालेत.
जरांगे पाटील यांचा इशारा
मराठ्यांमध्ये फूट पाडण्यासाठी ट्रॅप रचला जात असल्याचा खुलासा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केला होता. माझ्यावर ट्रॅप रचणाऱ्यांच्या नावांचा लवकरच गौप्यस्फोट करणार असल्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केलीय. ट्रॅप रचणाऱ्यांची नावं मुंबईत जाहीर करणार असल्याची माहिती जरांगे यांनी झी 24 तासवर बोलताना दिलीय. नेत्यांनी मराठा बांधवांचा फक्त वापर केला. तेव्हा शहाणे व्हा आणि आरक्षण मिळेपर्यंत राजकारण करु नका असं आवाहन जरांगेंनी मराठा समाजाला केलंय.. नेत्यांची मुलं परदेशात शिकली. मात्र आपल्या मुलांचं काय? असा सवालही जरांगेंनी केलाय .ग्रामस्थांकडून जरांगे पाटील यांचं भव्य दिव्य स्वागत करण्यात येतंय..
मराठा सर्वेक्षणात अडचणी
मराठा सर्वेक्षणात सलग दुसऱ्या दिवशीही मनस्ताप सहन करावा लागतोय. राज्य सरकारने तयार केलेलं अॅप मराठा सर्वेक्षणात खोडा घालतंय. सलग दुसऱ्या दिवशीही मराठा सर्वेक्षणात तांत्रिक अडचणी येत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी अॅपमुळे मराठा सर्वेक्षण बंद पडलंय. बीड जिल्ह्यामध्ये परळी, केज आणि अंबेजोगाईत तसंच परभणी आणि नांदेडमध्येही प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतोय. सर्वे केल्यानंतर सही अपलोड केल्यानंतर सबमिट बटनच येत नाही. अनेक प्रगणकांचे मोबाईल नंबर चुकले आहेत. अनेक ठिकाणी सर्वेक्षणाशी संबंधित गावाचं नावच मिळत नाहीये. अशा अनंत अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळे मराठा सर्वेक्षण होणार कधी आणि मराठा आरक्षण मिळणार कधी असा संतप्त सवाल मराठा समाजाने विचारलाय.
हिंगोलीत सर्वेक्षण करणाऱ्या प्रगणकांना ऍपच्या सावळ्या गोंधळाचा अनुभव आलाय. 21 कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण केल्यानंतर ऍपवर 61 कुटुंबांचं सर्वेक्षण झाल्याचं दिसतंय. तर 14 घरांची माहिती भरल्यानंतर 47 घरांची माहिती भरल्याचं दाखवल्याची तक्रार प्रगणकांनी केलीय. सर्वेक्षणात अडचणी येत असल्याचं वसमतच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनीही मान्य केलंय.