ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना `महाराष्ट्र भूषण` पुरस्कार जाहीर
Maharashtra Bhushan Award 2023 : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना `महाराष्ट्र भूषण` पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
सागर कुलकर्णी, मुंबई : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशोक सराफ यांच्या नावाची घोषणा केली आहे. 2023 वर्षासाठीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही केले. अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले असे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन करतांना म्हटले आहे.
अशोक सराफ यांची पहिली प्रतिक्रिया
'महाराष्ट्र भूषण' हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पुरस्कार आहे. आणि तो मला जाहीर झाला याचा मला अतिशय आनंद आहे. मला एका मोठ्या स्थानावर नेऊन बसवल्याचा आनंद होतोय. वयाची पन्नास वर्षे माझी इंडस्ट्रीतील सत्कार्णी लागली असल्याचा आनंद झाला. आपली कामगिरी कुठे तरी रुजू होतेय याचा देखील आनंद झाला. आतापर्यंत अनेक दिग्ग्जांना हा पुरस्कार जाहीर झाला. त्यांच्यासोबत मला पुरस्कार जाहीर झाल्याचा आनंद आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिनंदन
अशोक सराफ यांनी विनोदी भूमिकांसोबतच गंभीर ते अगदी खलनायकांपर्यंतच्या सगळ्याच भूमिका पार पाडल्या. आपल्या अभिनयातून कायमच त्यांनी रसिकांचे मन जिंकले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक करुन अभिनंदन केलंय.
अभिनेते अशोक सराफ यांचा जन्म 4 जून 1947 रोजी झाला. त्यांनी अनेक मराठी चित्रपट तसंच थिएटरमध्ये काम केलं आहे. त्यांच्या अभिनयासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आल आहे. मराठीसोबतच हिंदी मालिकांमधूनही अशोक सराफ यांनी प्रेक्षकांचं मन जिंकलं.
अभिनेता अशोक सराफ यांना अभिनय क्षेत्रातच काम करायचे होते. पण त्याअगोदर त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी केली. सोबतच थिएटरमधील कामही सुरु ठेवलं. गेली पन्नासहून अधिक वर्षे ते या इंडस्ट्रीशी जोडले गेलेले आहेत.