MHADA Lottery | घर घेणाऱ्यांसाठी खूशखबर, म्हाडा राज्यभरात बांधणार 12,724 घरं
Mhada Lottery 2023 : म्हाडाच्या घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या घर खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण 2023-24 च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार प्राधिकरणाने मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, अमरावती किंवा प्रादेशिक मंडळांमध्ये एकूण 12,724 घरे बांधण्याचे प्रस्तावित केले आहे.
देवेंद्र कोल्हटकर, मुंबई : मुंबई, पुण्यात आपलं स्वत:चा हक्काच घर असावं असं प्रत्येकाला वाटतं. पण अनेकांना ते जमत नाही. यासाठी राज्य सरकार म्हाडाच्या घर योजनेअंतर्गत सर्वसामान्यांना घरे देण्याची योजना राबवत असते. त्यामुळे आतासुद्धा स्वतःच घर विकत घेण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. कारण महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाने (Mhada) 2022-23 या वर्षासाठीचा सुधारित अंदाजपत्रक आणि 2023-2024 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला आहे.
प्राधिकरणाच्या सन 2023-2024 चे 10186.73 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला व सन 2022-2023 च्या सुधारित 6933.82 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला प्राधिकरणानाची मान्यता मिळाली आहे. सन 2023-2024 च्या अर्थसंकल्पात शून्य तूट तर 2022-2023 या वर्षासाठी सुधारित अर्थसंकल्पात 1136.47 कोटी रुपयांची तूट दर्शविण्यात आली आहे. सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार प्राधिकरणाने मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, अमरावती या प्रादेशिक मंडळांमध्ये एकूण 12,724 घरे बांधण्याचे प्रस्तावित केले आहे. यासाठी अर्थसंकल्पात 5800.15 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मुंबईत 2152 घरे बांधणार
मुंबई परिमंडळांतर्गत येत्या आर्थिक वर्षात 2152 घरे उभारणी करण्याचे प्रस्तावित केले आहे. यासाठी 2023-24 च्या अर्थसंकल्पीय अंदाजात 3664.18 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. BDD चाळींचा पुनर्विकास योजनेसाठी मंडळाने 2285 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. अँटॉप हिल वडाळा येथील गृहनिर्माण योजनेसाठी 24 कोटी, बॉम्बे डाईंग मिल वडाळा योजनेसाठी 30 कोटी रुपये, कोपरी पवई येथील गृहनिर्माण योजनेसाठी 100 कोटी रुपये, कन्नमवार नगर विक्रोळी येथील योजनेसाठी 213.23 कोटी रुपये, मागाठाणे बोरिवली येथील योजनेसाठी 50 कोटी रुपये, खडकपाडा दिंडोशी येथील गृहनिर्माण योजनेसाठी 18 कोटी रुपये, तर पहाडी गोरेगाव येथील गृहनिर्माण योजनेसाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गोरेगाव सिद्धार्थ नगर (पत्राचाळ) प्रकल्पासाठी 300 कोटी रुपये, धारावी पुनर्विकास प्रकल्प फेज 1 साठी 59 कोटी रुपये, गोरेगाव मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पासाठी 10 कोटी रुपये आणि पोलीस गृहनिर्माण प्रकल्पाच्या पुनर्विकासासाठी 100 कोटी रुपये ठेवण्यात आले आहेत.
वाचा: तुमचे कर्ज महाग होणार की स्वस्त? आरबीआयची मोठी घोषणा
कोकण विभागांतर्गत 5614 घरांची उभारणी करण्याचे प्रस्तावित केले असून त्यासाठी 2023-24 या वर्षाच्या अंदाजपत्रकात 741.36 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सर्कल अंतर्गत विरार बोळींज गृहनिर्माण प्रकल्पासाठी 10 कोटी रुपये, बाळकुम ठाणे गृहनिर्माण प्रकल्पासाठी 33 कोटी रुपये, माजिवडे ठाणे संयुक्त भागीदारी प्रकल्पासाठी 35 कोटी रुपये आणि मीरारोड वळण प्रकल्पासाठी 15 कोटी रुपयांची तरतूद सन 2023-24 च्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
- पुणे परिमंडळांतर्गत 862 घरे बांधण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी 2023-24 या वर्षाच्या अर्थसंकल्पात 540.70 कोटी रुपयांची तरतूद
- नागपूर मंडळांतर्गत 1417 घरे बांधण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी 2023-24 या वर्षाच्या अर्थसंकल्पात 417.55 कोटी रुपयांची तरतूद
- औरंगाबाद परिमंडळांतर्गत 1497 घरे बांधण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी 2023-24 या वर्षाच्या अर्थसंकल्पात 212.08 कोटी रुपयांची तरतूद
- नाशिक परिमंडळांतर्गत 749 घरे बांधण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी 2023-24 या वर्षाच्या अर्थसंकल्पात 77.32 कोटी रुपयांची तरतूद
- अमरावती सर्कल अंतर्गत 433 घरे बांधण्याचे प्रस्तावित असून त्यासाठी 2023-24 च्या अर्थसंकल्पात 146.24 कोटी रुपयांची तरतूद