39 लाखांचे घर 29 लाखांत तर 62 लाखांचे घर 50 लाखांत मिळणार, म्हाडा लॉटरीचे अर्ज भरण्याची वेळ काही तासांत संपणार
Mhada Lottery : खिशाला परवडेल अशा किंमतीत सर्वसामान्यांना ही घरं मिळणारेत. म्हाडाची ही घरं मालाड, गोरेगाव, दिंडोशी, पवई कोपरी, विक्रोळी कन्नमवार नगर या भागांमध्ये उपलब्ध असणार आहेत.
Mhada Lottery 2024 : मुंबईत स्वप्नाचं घरं साकारण्यासाठी म्हाडाची लॉटरी मोठा दिलासा ठरणार आहे. म्हाडा लॉटरीचे अर्ज भरण्याची मुदत काही तसांत संपणार आहे. यामुळे ज्यांना म्हाडा लॉटरीसाठी अर्ज दाखल करायचे आहेत त्यांच्यासाठी ही शेवटची संधी आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण ( म्हाडा) च्या वतीनं काही दिवसांपूर्वीच मुंबईतील दोन हजारांहून अधिक घरांसाठीची सोडत जाहीर केली आहे. किंमत जास्त असल्याने इच्छुकांनी नाराजी व्यक्त केली होती. यानंतर मुंबईतील म्हाडाच्या घरांच्या किंमतीत 10 ते 25 टक्के कपात करण्यात आली होती.
सर्वसामान्यांसाठी स्वस्तात घरे बांधणा-या म्हाडाच्या घरांच्या किंमती पाहून अर्जदारांचे डोळे पांढरे झाले होते. अल्प उत्पन्न गटासाठी वरळीतील सस्मिरा येथील 550 चौरस फुटांच्या फ्लॅटची किंमत तब्बल 2 कोटी 62 लाख एवढी आहे...याव्यतिरिक्त विजेत्यांना सेवाशुल्क आणि मालमत्ता करही भरावा लागणार आहे... त्यामुळे नऊ लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्यांना हा प्लॅट कसा परवडणार... बँका त्यांना एवढे कर्ज देतील का असे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. यानंतर म्हाडाच्या घरांच्या किंमतीत कपात करण्यात आलीय आहे. मुंबई मंडळाच्या सोडतीतील 370 घराच्या किंमतीमध्ये 10 ते 25 टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिलीये.. त्यामुळे म्हाडाचं 62 लाखांचे घर 50 लाखांत, 39 लाखांचे घर 29 लाखांत मिळणार आहे...
म्हाडाने 2030 सदनिकांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. यासाठी अर्ज भरण्याची मुदत 19 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजता संपणार आहे. 19 सप्टेंबर, 2024 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाइन अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येणार आहे. 9 ऑगस्ट, २०२४ रोजी म्हाडा लॉटरीची अर्ज नोंदणी सुरु झाली. 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर इथं सोडतीतील विजेत्यांची यादी जाहीर केली जाणार आहे. सोडत झाल्यानंतर सोडतीमधील यशस्वी व प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची नावे म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.
मुंबई मंडळाच्या सन २०२४ च्या सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी (Economically Weaker Section) 359 सदनिका, अल्प उत्पन्न गटासाठी (Lower Income Group) 627 सदनिका, मध्यम उत्पन्न गटासाठी (Middle Income Group) 768 सदनिका, उच्च उत्पन्न गटासाठी (Higher Income Group) 276 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या सोडतीत म्हाडाच्या मुंबई मंडळाने बांधलेल्या 1327 सदनिका, विकास नियंत्रण नियमावली 33 (5), 33 (7) व 58 अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून विकासकांकडून गृहसाठा (Housing Stock) म्हणून म्हाडाला प्राप्त 370 सदनिका (नवीन व मागील सोडतीतील सदनिका) व मागील सोडतीतील विविध वसाहतीतील विखुरलेल्या 333 सदनिकांचा समावेश आहे.
सदनिकांच्या वितरणासाठी म्हाडाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेले नाही. अर्जदाराने कोणत्याही अशा व्यक्तीशी परस्पर व्यवहार करू नये तसे केल्यास मुंबई मंडळ कोणत्याही व्यवहारास / फसवणूकीस जबाबदार राहणार नाही, असे आवाहन म्हाडातर्फे करण्यात आले आहे.