Mhada Lottery 2024: मुंबईत हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्यांची इच्छा आता लवकरच पूर्ण होणार आहे.  म्हाडाच्या मुंबईतील २०३० घरांसाठी अर्ज करण्यासाठी शेवटचे काही तास उरले आहेत. आज दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज म्हाडाच्या घरांसाठी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे. तर, आजच रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाइन अनामत रक्कम भरण्याची मुदत आहे. बुधवारपर्यंत म्हाडाच्या घरांसाठी १ लाख १० हजार ७५४ इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले असून ८६ हजार २८८ जणांनी अनामत रकमेसह अर्ज सादर केले आहेत. येत्या ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता नरीमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे संगणकीय सोडत काढली जाणार आहे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत एक तरी घर असाव अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र मुंबईत वाढत जाणाऱ्या किंमती पाहून सर्वसामान्यांना परवडत नाही. म्हाडाकडून सर्वसामान्यांसाठी वाजवी दरात घरे उपलब्ध केली जातात. 2023 साली म्हाडाच्या मुंबई मंडळासाठी 4 हजार घरांची लॉटरी काढली होती. तर, 2024 साली 2030 घरांचा समावेश लॉटरीत केला आहे. आज म्हाडाच्या घरांचा अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. अर्जदारांना दुपारी 12 पर्यंत अर्ज भरता येणार आहे. 


मुंबई मंडळाच्या यंदाच्या सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी ३५९, अल्प उत्पन्न गटासाठी ६२७, मध्यम उत्पन्न गटासाठी ७६८ आणि उच्च उत्पन्न गटासाठी २७६ घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या सोडतीत म्हाडाच्या मुंबई मंडळाने बांधलेल्या १३२७ सदनिका, विकासकांकडून गृहसाठा म्हणून म्हाडाला प्राप्त ३७० सदनिका आणि मागील सोडतीतील विविध वसाहतीतील विखुरलेल्या ३३३ घरांचा समावेश आहे. २७ सप्टेंबरला सायंकाळी ६ वाजता सोडतीसाठी प्राप्त अर्जाची प्रारूप यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.


२९ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत ऑनलाइन दावे- हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. ३ ऑक्टोबरला सांयकाळी ६ वाजता सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी म्हाडाच्या या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. तर, 8 ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता नरीमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे संगणकीय सोडत काढली जाणार आहे.