सांगली : सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये २४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. या घटनेची अतिशय गांभीर्याने दखल घेऊन मिरज येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचं रुपांतर आता कोरोना रुग्णालयात करण्यात आलं आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी याबाबतची माहिती दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इस्लामपूरमध्ये अचानकपणे वाढलेल्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात येताच मुंबईतील जे.जे. समूह रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली तातडीने त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली होती. डॉ. पल्लवी सापळे यांनी तातडीने मिरज येथे भेट देत तेथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाचे तातडीने 300 खाटांची व्यवस्था असणाऱ्या कोरोना रुग्णालयात रुपांतर केलं आहे. 


मिरजमधील या रुग्णालयात पंधरा आय.सी.यू . बेड, सिटी स्कॅन, एम.आर.आय. या सुविधाही उपलब्ध करण्यात आल्या आहेत. करोना तपासणीसाठी येत्या तीन ते चार दिवसात तपासणी केंद्राची निर्मितीही येथे करण्यात येणार आहे. 


 


मिरज येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील सर्व रहिवासी डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ. वाहन चालक आणि अन्य कर्मचाऱ्यांना यासंबंधीचं प्रशिक्षण देण्याचं कामही सुरु करण्यात आलं आहे. येत्या आठवडाभरात हे प्रशिक्षण पूर्ण करण्यात येईल असंही देशमुख यांनी सांगितलं.