नवी दिल्ली : कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. मतदारसंघाच्या विकासासाठी राष्ट्रवादी नेते आणि आमदार रोहित पवार यांनी ही भेट घेतली. नागरिकांसाठी सर्व सुविधांची पूर्तता करता यावी यासाठी निधी मिळावी म्हणून त्यांनी अर्थमंत्र्यांकडे मागणी केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्जत आणि जामखेड तालुक्यांमधील आर्थिक विकासाच्या दृष्टीने धोरणात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी रोहित पवार यांनी अर्थमंत्र्यांसोबत चर्चा केली. यावेळी विविध योजना आणि मुद्द्यांवर त्यांनी चर्चा केली.


मतदारसंघात आर्थिक व्यवहारांसाठी बँकांची संख्या कमी आहे. यामुळे राष्ट्रीयकृत बँकांचे व्यवहार याठिकाणी अधिक प्रमाणात वाढावे आणि येथील स्थानिक नागरिक, शेतकरी, छोटे व्यावसायिक यांना संघटीत बँकिंग व्यवस्थेच्या मदतीने अर्थसहाय्य मिळावे यासाठी रोहित पवार पाठपुरावा करत आहेत. 


शहरी असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी राष्ट्रीय शहरी रोजगार हमी कार्यक्रम राबविण्याबाबत आणि कर्जत- जामखेडमध्ये इतर आर्थिक घडामोडी आणि राष्ट्रीयकृत बँकांचे अधिकाधिक व्यवहार वाढण्यासाठी नवीन बँकाबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन यावेळी निर्मला सीतारामन यांनी दिल्याचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.


आमदार रोहित पवार यांनी याआधी केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांचीही भेट घेतली. तसेच केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांची आमदार रोहित पवार यांनी भेट घेऊन USTTAD च्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत आणि जामखेड तालुक्यांचा समावेश करण्याची विनंती केली.