मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा रस्त्यांवरील खड्डे, वाहतूक कोंडी यावर भाष्य केलं असून प्रशासनाला धारेवर धरलं आहे. लोक आपल्या समस्यांकडे दुर्लक्ष करत परत त्यांनाच निवडून देतात. मतपेटीतून राग व्यक्त होत नाही तोवर हे खड्डे बुजणार नाहीत असं सांगत राज ठाकरे यांनी लोकांनाही जबाबदार धरलं आहे. पुण्यात पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्धाटन करण्यात आला. यादरम्यान राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"हे खड्डे पहिल्यांदाच पडलेले नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून हे खड्डे पडत असून लोक त्यातून प्रवास करत आहोत. पण मला जनतेचं आश्चर्य वाटत आहे. जे लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून देता तेच हे खड्ड्यांचे प्रश्न उभे करतात आणि प्रत्येकवेळी जाती, धर्माच्या नावे त्यांना निवडून देता. असं असेल तर तर तुमचे प्रश्न सुटणारच नाहीत. जोपर्यंत लोकप्रतिनिधींच्या विरोधातील राग मतपेटीतून व्यक्त होत नाही तोवर रस्त्यांवरचे हे खड्डे बुजणार नाही," असं राज ठाकरे म्हणाले आहेत. 


"आजपर्यंत मनसेने अनेक विषयांवर अनेक आंदोलनं केली आहेत. पण पदरी काय पडलं? याउलट सर्वार्थाने नुकसान करणाऱ्यांना तुम्ही निवडून देता याचंच आश्चर्य वाटतं. पण तरीही पुण्यात आमची आंदोलनं सुरु आहेत. मुंबई-गोवा, मुंबई-नाशिक येथेही आंदोलनं सुरु असून सरकारचे डोळे उघडतील अशी आशा आहे," अशी अपेक्षा राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे. 


दरम्यान पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड केली जात असल्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले "प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करत आहे. सगळीकडे तोडफोड करण्याची गरज नसते हे मी सांगितलं आहे. लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या हे सांगितलं आहे. रस्त्यावरुन महिला, गरोदर स्त्रिया जात असतात. ज्यांच्यासाठी आंदोलन करत आहोत त्यांनाच त्रास होऊ नये, यासाठी दक्षता घेतली आहे. काहीजण आक्रमकपणे उतरणार हे स्वाभाविक आहे, त्याचं काही करु शकत नाही". 


आपल्याकडे कायदा नावाची गोष्टच राहिलेली नाही. निवडणुका वाटेल तेव्हा घेणार अशी भूमिका आहे. त्यांना कोणीही प्रश्न विचारत नाही अशी टीका राज ठाकरेंनी केली. 


"शहरांवर अजिबात लक्ष नाही. आपल्याकडे विकास नियोजन होतं, पण शहर नियोजन होत नाही. आज पुणे कसं पसरतंय याकडे कोणाचंच लक्ष नाही. हडपरसही फार मागे राहिलं आहे. मतदार वाढवा, मतदान पदरात पाडून घ्या, बाकी तेल लावत गेलं हेच सध्या सुरु आहे. काही गोष्टींचे नियम असतात. लोकसंख्येनुसार शाळा, मार्केट, हॉस्पिटल अशा गोष्टी असतात. पण यांना कोणी विचारत नाही. जन्म झाला म्हणून जगत आहेत," अशी खंत राज ठाकरेंनी व्यक्त केली.