प्रशांत अंकुशराव झी 24 तास, मुंबई: विश्वास हा प्रत्येक नात्याचा पाया असतो; तर संशयाची कीड नातं उद्धवस्थ करतं. अशीच संशयाची कीड आई आणि मुलाच्या नात्याला लागली आणि घडला गुन्हा. मुंबईच्या वडाळा परिसरात असाच एक गंभीर गुन्हा घडला आहे. या गुन्ह्यात मुलांनीच आपल्या आईची हत्या केली. हा गुन्हा संशयातून घडला आहे आणि संशय आहे काळ्या जादूचा. 


संशयाने घेतला बळी?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घटना 4 जूनची आहे. निर्मला ठाकूर (Nirmala Thakur) आपल्या कुटुंबासह वडाळ्याच्या पंचशिल नगर (wadala Panchashil nagar) येथे राहत होत्या. मोठा मुलगा अक्षय विजय ठाकूर (Akshay Vijay Thakur) ऐन तारुण्यात होता.  तर दुसऱ्या मुलाचे अद्याप लग्नाचे वय झालं नव्हतं. 4 जूनच्या रात्री पोलिसांना वर्दी मिळते की, एका महिलेच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करुन हत्या करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलीस पोहोचतात, तपास सुरु होतो. 24 तासाच्या आत तीन आरोपींना अटक होते. अटक झालेल्या आरोपींची नावं समोर येतात. अनेकांच्या पायाखालची जमीन सरकते. गुन्हा करणारे दुसरे तिसरे कुणी नसतात तर त्या दुर्दैवी मातेची मुलंच असतात. 


का केली हत्या?


आरोपींमध्ये मोठा मुलगा अक्षय विजय ठाकूर, त्याची मैत्रिण कोमल दत्तात्रेय भोईलकर (Komal Dattatrey bhoilkar) आणि अक्षयचा लहान भाऊ यांचा समावेश होता. पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपी पोपटासारखे बोलू लागले आणि सत्य समोर आलं. मोठा मुलगा अक्षय आणि कोमल यांचे प्रेमसंबंध होते मात्र लग्न होत नव्हतं. आपलीच आई लग्न रोखण्यासाठी काळी जादू करुन करणी करत असल्याचा संशय अक्षयला होता. याचा राग त्याच्या मनात होता. याच कारणावरुन घरात वारंवार भांडणं होत होती. अखेर त्याने हत्येचा कट रचला. लहान भाऊ आणि मैत्रिणीच्या मदतीने त्याने थेट आईची हत्या केली. पण गुन्हेगार जास्त दिवस पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकू शकत नाही. अवघ्या 24 तासांतच पोलिसांनी या प्रकरणाचा  छडा लावत आरोपींना बेड्या ठोकल्या