मस्तच! निवृत्त झालेल्या डबलडेकर बसचा कायापालट होणार; आर्ट गॅलरी,कॅफेटेरिया अन्...
Mumbai Double-Decker Bus: डबल डेकर बस सेवेतून निवृत्त झाली आहे. मात्र तरीदेखील मुंबईकरांना डबल डेकर बसच्या आठवणी जपता येणार आहेत. लवकरच मुंबई महानगरपालिका नवी योजना राबवत आहे.
Mumbai Double-Decker Bus: मुंबईत पर्यटनाला चालना मिळावी यासाठी मुंबई महानगरपालिकेने नवीन शक्कल लढवली आहे. बेस्ट सेवेतून हद्दपार झालेल्या व जुन्या झालेल्या डबलडेकर बसचा वापर पर्यटनासाठी केला जाणार आहे. या जुन्या डबलडेकर बसमध्ये आर्ट गॅलरी, कॅफेटेरिया आणि वाचनालय यासारख्या सुविधा तयार करण्याची योजना साकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अंतर्गंत बी वॉर्डमध्ये तीन डबलडेकर बसमध्ये ही योजना सुरु करण्यात येणार आहे. या बस दक्षिण मुंबईतील तीन जंक्शनांमध्ये पार्क करण्यात येणार आहे. इथे लोकांना आर्ट गॅलरी,कॅफेटेरिया आणि वाचनालयाची सुविधा मिळणार आहे. यासाठी काही दिवसांपूर्वीच टेंडर जारी करण्यात आले आहेत.
फेब्रुवारी 2024 पासून सुरू होणार ही योजना
मुंबई महानगर पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी 2024मध्ये बेस्ट डबल डेकर बसमध्ये या सर्व सुविधा तयार करण्यात येण्याची शक्यता आहे. पायलट प्रोजेक्ट अंतर्गंत दक्षिण मुंबईतील एका वॉर्डमध्ये या सेवा सुरु करण्यात येणार आहे. ही योजना यशस्वी झाल्यानंतर मुंबई शहरातील अन्य 24 वॉर्डमध्ये देखील ही योजना राबवण्यात येईल. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डबल डेकर बसचे डिझाइनदेखील आर्किटेक्टने मुंबई महानगरपालिकेला दिले आहे.
एका डबल डेकर बसमध्ये कॅफेटेरिया, दुसऱ्या बसमध्ये लायब्रेरी आणि तिसऱ्या बसमध्ये आर्ट गॅलरीची सुविधा राबवण्यात येणार आहे. दरम्यान प्रशासनाने जुन्या बस स्क्रॅप केल्या आहेत. मात्र आता त्यात आवश्यकतेनुसार बदल करण्यात येणार असून त्या उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. बदल करण्यात आलेल्या तीन डबलडेकर बस तीन जंक्शनवर उभ्या करण्यात येणार आहे. त्यात वाय.एम.रोड, क्रॉफर्ड मार्केट आणि शालीमार जंक्शन यांचादेखील समावेश आहे.
जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये अनेक चित्रकारांना त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवणे शक्य होत नाही. त्यामुळं अशा काही योजनांमधून त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवणे शक्य झाल्यास लोकांनाही फायदा होऊ शकतो. कॅफेटेरिया आणि लायब्रेरीचाही सामान्य लोक फायदा घेऊ शकतात, अशी प्रतिक्रिया मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.
दरम्यान, मुंबईमध्ये सर्वात पहिली डबल डेकर बस 8 डिसेंबर 1937 रोजी सुरू झाली होती. एका बसची लाइफ 15 वर्ष असते. 15 सप्टेंबर 2023 रोजी जुन्या डबलडेकर बसला सेवेतून बाद करण्यात आले होते. मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी या प्रकल्पात स्वारस्य दाखवलं आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. तसंच, जुन्या बसमध्ये इतर सुविधा उपलब्ध करुन देण्याचे अश्वासनदेखील दिले होते. त्यानंतर महानगरपालिकेने या बस पूर्णपणे स्क्रॅप करण्याऐवजी त्यांचा उपयोग करण्याचे ठरवले.