मुंबईत खासगी विमान कोसळले, खराब हवामानामुळं विमानतळावरच अपघात
एक खाजगी विमान मुंबई विमानतळावर क्रॅश झाले आहे. 8 प्रवासी या अपघात ग्रस्त प्रायव्हेटमधून प्रवास करत होते.
mumbai airport plane crash : मुंबई विमानतळावर एक मोठी दुर्घटना घडली आहे. एक खाजगी विमान मुंबई विमानतळावर क्रॅश झाले आहे. 8 प्रवासी या अपघात ग्रस्त प्रायव्हेटमधून प्रवास करत होते अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. मुंबई विमानतळावर बचाव कार्य सुरु आहे.
मुंबई विमानतळावरच लँडिंगच्या वेळी हा अपघात घडला असल्याचे समजते. खराब हवामानामुळं विमान कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, विमान अपघात होताच विमानतळावरील सर्व वाहतूक बंद करण्यात आली. मुंबई विमानतळावरुन विमानांचे टेक ऑफ आणि लँडिंग थांबवण्यात आले.
8 प्रवासी करत होते विमानातून प्रवास
VSR Ventures Learjet 45 हे विमान अपघातग्रस्त झाले आहे. VT-DBL ऑपरेटिंग फ्लाइट विशाखापट्टणम ते मुंबई असे उड्डाण करत होते. हे विमान मुंबई विमानतळावर धावपट्टी क्रमांक 27 वर उतरत असताना हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले. लँडिंगच्या वेळी धावपट्टीवर हे विमान कोसळले. विमानात 6 प्रवासी आणि 2 क्रू मेंबर्स एकूण 8 जण प्रवास करत होते. विमान लँडिंग करत असताना अतिवृष्टीसह दृश्यता 700 मीटर होती. यामुळे खराब हवामानामुळेच विमान कोसळ्याची माहिती समोर येते. आत्तापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही अशी माहिती डीजीसीए कडून देण्यात आलेय.
घाटकोपरमध्ये कोसळले होते विमान
28 जून 2018 या दिवशी घाटकोपरमध्ये विमान कोसळलेले होते. हे विमान बेकायदेशीररित्या चाचणी उड्डाणावर होतं असा अहवाल संसदीय समितीने दिला होता. सी 90 या विमानाचा घाटकोपरमध्ये अपघात झाला होता. त्यात 5 जणांचा मृत्यू झाला होता. या विमानाने चाचणीसाठी जुहू इथल्या विमानतळावरून उड्डाण केले. सुमारे अर्धा तास हे विमान हवेत फिरल्यानंतर जमिनीवर उतरण्याच्या तयारीत असतानाच घाटकोपरमध्ये कोसळलं. किरीट सोमय्या यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या संसदीय समितीच्या अहवालात ही धक्कादायक माहिती पुढे आली होती.