Mumbai Towers Home Reserved: उद्धव ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार तसेच प्रवक्ते संजय राऊत यांनी मुंबईमधील टॉवर्समध्ये किमान 60 टक्के जागा या मराठी मध्यमवर्गीय आणि सरकारी कर्मचाऱ्यांना मिळण्यासंदर्भातील कायदा करण्याची मागणी केली आहे. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी गिरण्यांच्या जागी टॉवर्स उभे राहिले असून यामधून मराठी माणूस हद्दपार झाल्याचा दावा करत राऊत यांनी 'मुंबई आता गर्भश्रीमंतांचे शहर बनवले जात आहे' असं म्हटलं आहे. 


...तर मराठी माणसांच्या हाती काय राहिलं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"मुंबईतील गिरण्यांच्या बहुतेक जागांवर उंच टॉवर्स उभे राहिले. येथील मराठी माणूस दूर गेला. टॉवर्समध्ये आता मराठी माणसांना प्रवेश नाही. कारण ते मांसाहार करतात. महाराष्ट्राच्या क्षात्रतेजाचा हा अपमान आहे. शिवाजी महाराज, डॉ. आंबेडकर हे कधी शाकाहारी नव्हते व महाराष्ट्र त्यांच्या विचाराने आजही चाललाय. भाजपच्या लोढांनी मुंबईतील सर्व भूखंड मिळवले व अदानी यांनी सरकारी कृपेने मुंबईच्या जमिनी घेतल्या तर मराठी माणसांच्या हाती काय राहिलं?" असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.


टॉवर्समधला मतदार महाराष्ट्रावर प्रेम करीत नाही


"टॉवर्समधला मतदार महाराष्ट्रावर प्रेम करीत नाही. तो मुंबईतील संपत्तीवर प्रेम करतो व निवडणुकीत तो मराठी माणसांचा पराभव करण्यासाठीच टॉवर्समधून खाली उतरतो. ही एक समस्याच आहे. शेवटी ही मुंबापुरी कुणासाठी हे ठरल्याशिवाय ही समस्या सुटणार नाही," असं राऊत म्हणालेत. "मुंबईतील हाऊसिंग बोर्ड वसाहतीचे पुनर्वसन व निर्माण नव्याने होत आहे. येथेही पुन्हा टॉवर्सचेच राज्य. या टृॉवर्समध्येही शेवटी कोण येणार? या सर्व इमारतींमध्ये किमान 60 टक्के जागा मराठी मध्यमवर्गीयांना, सरकारी कर्मचाऱ्यांना मिळाव्यात हे कायद्याने ठरवायला हवे. तरच मुंबईवरील बिल्डरांचे राज्य व राजकारणातील पैशांचा माज कमी होईल," असं राऊत यांनी म्हटलं आहे.


नक्की वाचा >> 8000 कोटी मंजूर... मोदींनी महाराष्ट्रातील 30 KM च्या 'या' रस्त्यासाठी उघडली तिजोरी; संकल्पना गडकरींची!


...म्हणून मुंबईतले आंतरराष्ट्रीय पैसा केंद्र गुजरातला पळवले


"मुंबईच्या बी.के.सी.तील आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्राचा भूखंड मोदींनी सरळ बुलेट ट्रेनच्या ताब्यात दिला व मुंबईतले आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र उचलून गुजरातला नेले. या केंद्रामुळे मुंबईतील आर्थिक उलाढाल वाढली असती. मुंबईतील आंतरराष्ट्रीय पैसा केंद्र म्हणजे नक्की काय, हे सामान्य लोकांनी समजून  घेतले पाहिजे. लंडन, न्यूयार्क, टोकिओ, सिंगापूर, हाँगकाँग, बहरिन, बैरूत, झुरीक, बहामाज ही आज अशी पैसा केंद्रे आहेत. पैशांच्या उलाढाली व परकीय चलनाच्या उलाढाली (म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरची फसवाफसवी) फक्त येथे होतात असे नाही, तर त्याशिवाय त्याचे अनेक फायदेही आहेत. अशा आंतरराष्ट्रीय पैसा केंद्रांत सर्वांचे बँक अकाऊंटस् गुप्तपणे ठेवण्याचे काम चालते. सिंगापूर, हाँगकाँग, बहरिन, बैरूत, न्यूयार्क या सर्व ‘मनी सेंटर्स’मध्ये परकीय चलनाचे कसलेही निर्बंध नाहीत. त्यामुळेच गुजरातच्या व्यापाऱ्यांसाठी मुंबईचे हे आंतरराष्ट्रीय पैसा केंद्र गुजरातला पळवलेले दिसते," असा टोला राऊतांनी लगावला आहे.


नक्की वाचा >> 'संपूर्ण मुंबईच अदानींना आंदण दिली जातेय' म्हणत राऊतांनी दाखवली भूखंडांची यादी 


गर्भश्रीमंतांचे शहर


"मुंबई आता गर्भश्रीमंतांचे शहर बनवले जात आहे. मुंबईतील एक-एक फ्लाट 180 कोटीला विकला जातोय. काळ्या बाजाराचे व काळ्या पैशांचे हे अड्डे झाले. गरीब मराठी माणूस फुटपाथवर चालतो. त्याला श्रीमंतांच्या गाड्या उडवून पुढे जातात. या लढाईत गिरगाव, दादर, परळ, पार्ले आधीच पडले आहे. मुलुंड, भायखळा, वांद्रे, धारावी पडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मुंबई पडत आहे! पोर्तुगीजांच्या काळात जे घडले तेच आता घडत आहे!" असं राऊत यांनी लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.