'संपूर्ण मुंबईच अदानींना आंदण दिली जातेय' म्हणत राऊतांनी दाखवली भूखंडांची यादी

Whole Mumbai Is Given As Gift To Adani: धारावी पुनर्वसनाच्या बदल्यात अदानी व त्यांच्या बिल्डर्स टीमला महाराष्ट्र सरकार कोणते भूखंड देणार आहे यावर मुंबईकरांनी एकदा नजर टाकली पाहिजे, असं राऊत म्हणालेत.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 4, 2024, 07:21 AM IST
'संपूर्ण मुंबईच अदानींना आंदण दिली जातेय' म्हणत राऊतांनी दाखवली भूखंडांची यादी title=
राऊत यांचा हल्लाबोल (फाइल फोटो)

Whole Mumbai Is Given As Gift To Adani: उद्धव ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी धारावी पुर्नविकास प्रकल्पावरुन सत्ताधाऱ्यांबरोबरच अदानी समुहावर निशाणा साधला आहे. 'सामना'मधील रोखठोक सदरामधून राऊत यांनी गंभीर टीका करताना संपूर्ण मुंबईच अदानींना आंदण देण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं म्हटलं आहे. भूखंडांसंदर्भात धक्कादायक दावे करताना राऊत यांनी भूखंडांची एक यादीच शेअर केली आहे.

धारावी पुनर्वसनाच्या नावाखाली...

"धारावी हा आता मुंबईसाठी संघर्षाचा मुद्दा बनला आहे. निदान धारावी मराठी माणसांच्या हातात राहिली तरच मुंबईत आपल्याला मुक्तपणे वावरता येईल. धारावी ही यापुढे मुंबईची युद्धभूमी होणार आहे. कारण धारावी पुनर्वसन प्रकल्पाची सर्व मलई भाजप, शिंदे व गुजरातचे लाडके उद्योगपती खाणार आहेत," असा दावा राऊतांनी केला आहे. "धारावीचा विकास राज्याच्या गृहनिर्माण विभागाला करता आला असता. महाराष्ट्रातल्या विकासकांना एकत्र करून ‘क्लस्टर’ पद्धतीने धारावीचे पुनर्निर्माण केले असते तर महाराष्ट्राची संपत्ती महाराष्ट्रातच राहिली असती व धारावीच्या आठ लाख लोकांना 500 फुटांचे निवास मिळाले असते, पण धारावी पुनर्वसनाच्या नावाखाली मुंबई एक-दोन उद्योगपतींच्या घशात घालण्याची योजना धोकादायक आहे," असं राऊत म्हणालेत.

त्या 1300 एकर भूखंडांचा उल्लेखच नाही मग...

"धारावी पुनर्वसनाचे काम काही धर्मादाय नाही. बिल्डरांचा तो धंदाच आहे. धारावी पुनर्वसनाचा ‘मोबदला’ म्हणून अदानी यांना मुंबईत भरमसाट टीडीआर सरकारने दिला. या टीडीआरचे जणू अजीर्णच त्यांना होईल. वास्तविक धारावीकरांना 500 चौरस फुटांचे घर मिळायलाच हवे. धारावी नोटिफाईड विभागाचा विकास करून धारावीकरांना घरे व विकासक अदानी यांना भरपूर फायदा आधीच होत आहे. तरीही मोदी-शहांचे मित्र अदानी यांनी अजीर्ण होण्याची चिंता न करता मुंबईतील किमान 20 मोठे भूखंड गिळण्याचा जो प्रयत्न सुरू केला आहे तो न पटणारा आहे. धारावी पुनर्वसनाच्या नावाखाली ‘बिदागी’ म्हणून अदानी यांना मुंबईतील 1300 एकर मोक्याचे भूखंड मिळणार आहेत. धारावीसाठी ज्या निविदा निघाल्या त्या मूळ निविदेत या 1300 एकर भूखंडांचा उल्लेख नाही. मग हे भूखंडाचे श्रीखंड आले कोठून?" असा सवाल राऊत यांनी केला आहे.

नक्की वाचा >> 8000 कोटी मंजूर... मोदींनी महाराष्ट्रातील 30 KM च्या 'या' रस्त्यासाठी उघडली तिजोरी; संकल्पना गडकरींची!

पान-सुपारी म्हणून अदानी यांना...

"धारावीकरांचे पुनर्वसन ते जेथे आहेत तेथेच व्हायला हवे. मूळ भूखंडावर ते झाले पाहिजे. धारावीची जागा 590 एकरची आहे. त्यावर एफएसआय, पुन्हा वर 1300 एकरची बिदागी. या बिदागीतील पान-सुपारी म्हणून अदानी यांना कुर्ला येथील मदर डेअरीची 21 एकर जागा, मुलुंड जकात नाक्याचा राखीव भूखंड याचा समावेश आहे. वडाळा-मुलुंडच्या मिठागराच्या जमिनीही या पान-सुपारीत आहेत. धारावी पुनर्वसनाच्या बदल्यात अदानी व त्यांच्या बिल्डर्स टीमला महाराष्ट्र सरकार कोणते भूखंड देणार आहे यावर मुंबईकरांनी एकदा नजर टाकली पाहिजे. या यादीमधील किमान 15 भूखंडांचा धारावीशी संबंध नाही. मुंबईतील भूखंडच नव्हे तर संपूर्ण मुंबईच अदानी व त्यांच्या लोकांना कशी आंदण दिली जात आहे ते आता स्पष्ट झाले आहे. धारावी हे निमित्त आहे. संपूर्ण मुंबई महाराष्ट्राच्या हातून जात आहे," असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

(सामनातील रोखठोकमध्ये राऊत यांनी दिलेली यादी)

जमिनी गिळून ढेकर देणाऱ्यांच्या पाठीशी...

"धारावीच्या निमित्ताने मुंबईच्या मोक्याच्या जमिनी गिळून ढेकर देणाऱ्यांच्या पाठीशी आज महाराष्ट्राचे शासन उभे आहे. कारण लुटीतला वाटा त्यांना मिळतोय. हा वाटा किती? महाराष्ट्रावर सध्या जितके कर्ज आहे तेवढा वाटा मुंबई विकण्याची दलाली करणाऱ्यांना मिळेल," असं राऊत म्हणालेत.