मुंबईच्या धर्तीवर नागपुरात ‘ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र’ हवे - राऊत
नागपूर जिल्ह्यातील कोरोनाचा (Coronavirus in Nagpur) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबईच्या (Mumbai) धर्तीवर `ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र` उभारण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
मुंबई : नागपूर जिल्ह्यातील कोरोनाचा (Coronavirus in Nagpur) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबईच्या (Mumbai) धर्तीवर नागपूर शहरातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी एक या प्रमाणे 'ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र' (drive in vaccination centres in mumbai) उभारण्यात यावे, अशी मागणी ऊर्जामंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत ( Nitin Raut) यांनी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
दिव्यांग नागरिक आणि ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रापर्यंत पोहचून लस घेणे जिकिरीचे ठरते. ही बाब लक्षात घेऊन मुंबईत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्ती यांचे कोरोना लसीकरण सुलभ होण्यासाठी मुंबई महापालिकेने शहरातील पहिले 'ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र' दादर येथील कोहिनूर पार्किंग लॉटमध्ये नुकतेच सुरू केले आहे. या केंद्रावर दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना आपल्या वाहनात बसूनच लस घेता येते. यामुळे लसीकरण वेगात होत असून या केंद्राला मुंबईकरांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.
नागपूर शहरात 'ड्राइव्ह इन लसीकरण केंद्रे' सुरू केल्यास ज्येष्ठ आणि नागरिक दिव्यांग यांना लसीकरण केंद्रावर रांगेत उभे राहण्याचा त्रास वाचेल. तसेच लसीकरण वेगाने होईल. याशिवाय आरोग्य यंत्रणेलाही ज्येष्ठ आणि दिव्यांग नागरिकांना सुलभतेने लसीकरण सेवा पुरवत येईल, असे डॉ.राऊत यांनी टोपे यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.