मुस्लिम तरुणीने उर्दूत लिहीली संपूर्ण भगवद्गीता; दीडशे श्लोक केले तोंडपाठ
Nanded News : नांदेडमधल्या एका तरुणीने भगवद्गीतेचे संस्कृतमधून उर्दूत भांषातर केले आहे. तीन महिन्यात या तरुणीने भगवद्गीतेच्या 700 श्लोक उर्दूमध्ये भाषांतरीत केले आहेत.
सतिश मोहिते, नांदेड, झी मीडिया : देशात अनेकवेळा धर्मांवरुन लोकांमध्ये वादविवाद, भांडणे होण्याच्या घटना घडत असतात. मात्र काहीजण या सगळ्यातही दोन्ही बाजूंना सलोखा राखण्याचा प्रयत्न करत असतात. अशातच नांदेडमध्ये हिंदू धर्माबाबत जाणून घेण्यासाठी एका तेवीस वर्षीय मुस्लीम तरुणीने भगवद्गीतेचे उर्दू भाषेत भाषांतर केले आहे. तीन महिन्यात या तरुणीने भगवद्गीता उर्दू भाषेत लिहिलीये. कोणाचीही मदत न घेता या तरुणीने भगवत गीतेचे भाषांतर केले. विशेष म्हणजे भगवद्गीतेमधील 700 श्लोकांपैकी दीडशे संस्कृत श्लोक तरुणीने तोंडपाठ केले आहेत.
हिबा फातिमा असे या तरुनीचे नाव आहे. हिबा फातिमा ही तेलंगणा राज्यातील निझामाबाद जिह्यातील बोधन येथील रहिवाशी आहे. पदवीपर्यंत तिने उर्दू भाषेत शिक्षण पूर्ण केले. सध्या ती पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. हीबा फातिमा हीचे अनेक शेजारी, मैत्रिणी हिंदु आहेत. हिंदू - मुस्लीम वाद, दंगली अशा बातम्या ऐकून तिला हिंदू धर्माबाबत माहिती घेण्याची इच्छा झाली होती. हिंदू शेजारी आणि मैत्रिणीकडून तिने हिंदू धर्माबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण हिबाला परिपूर्ण महिती मिळाली नाही. कोणत्याही धर्माची परिपूर्ण माहिती हवी असेल तर त्या धर्माचे धर्मग्रंथ वाचून समजून घेतले पाहिजे असं तिला कळालं.
हिंदी आणि इंग्रजी भाषेतील भगवद्गीता तिने मागवली. लिपी इंग्रजी पण संस्कृत भाषा असलेली भगवत गीता हिबा वाचू लागली. संस्कृत शब्दाचे अर्थ ती गुगल आणि अन्य ॲपवरुन समजून घ्यायची आणि उर्दु भाषेत लिहून काढायची. अशा पद्धतीने तिने संपूर्ण गीता उर्दू भाषेत लिहून काढली. या उर्दू भाषेतील भगवद्गीतेच्या छपाई आणि प्रकाशनासाठी तिने राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुंबईत भेट घेतली होती. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी तिला मोलाची मदत केली. जानेवारी महिन्यात हिबा फातिमाच्या उर्दु भाषेतील भगवद्गीतेचे प्रकाशन होणार आहे. आपल्या या कार्याच दोन्ही धर्मातील ज्ञानी लोकांनी स्वागत केलं. पण अज्ञानी लोकांनी विरोध केल्याचे हीबाने सांगितले आहे. कुराण आणि गीतामध्ये कुठेही जात, धर्म, द्वेष नाही. दोन्ही ग्रंथात मानवतेचा संदेश असल्याचे हिबा फातिमा सांगते.
"भगवत गीतेमध्ये 700 श्लोक आहेत. त्यातील 150 श्लोक मी पाठ केले आहेत. तेलगु, हिंदी आणि इंग्रजी गीतेच्या माध्यमातून मी उर्दुमध्ये गीता लिहीण्यास सुरुवात केली. भगवत गीता हिंदु मुस्लिमध्ये विभागणी करत नाही. मी शब्दशः गीता भाषांतरीत केली आहे. ही जगातली एकमेक गीता आहे. एका दिवसात एक श्लोक मी भाषांतरीत केला आहे. त्यानंतर माझा वेग वाढला आणि प्रत्येक दिवसाला मी पाच श्लोक भाषांतरीत करु लागले. मी कुठेतरी ऐकलं होती ज्या धर्माबद्दल जाणून घ्यायचं आहे त्याचा धर्मग्रंथ वाचा. त्यामुळे मी गीता वाचायला सुरुवात केली. माझ्या वडिलांनी हिंदी आणि तेलगुमध्ये भाषांतरीत केली. मला याबद्दल जाणून घ्यायचं होतं म्हणून ती भाषांतरीत केली. मी एकटीने हे काम केलं आहे. तीन महिन्यात हे काम पूर्ण केले," असे हीबा फातिमाने म्हटलं.