समस्या सोडवायला गेला अन् आणखी अडकला; फरक न पडल्याने भक्ताकडून मांत्रिक महिलेची हत्या
Nashik Crime : नाशिकमध्ये घडलेल्या या प्रकारानं एकच खळबळ उ़डाली आहे. भरदिवसा झालेल्या हत्येने शिंदेगावात दहशतीचे वातावरण आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली आहे.
सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक : नाशिकमध्ये (Nashik Crime) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. देवाची गादी चालवणाऱ्या महिलेकडून फसवणूक झाल्याच्या कारणावरून भक्त असलेल्या एका युवकाने तिची गळ्यावर वार करुन हत्या केल्याचा प्रकार घटना नाशिकच्या शिंदे गावात घडलिये. शुक्रवारी भर दिवसा झालेल्या प्रकाराने शिंदेगाव आणि पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे. पोलिसांनी (Nashik Police) तात्काळ हल्लेखोरस ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु केला आहे.
जनाबाई भिवाजी बर्डे अस मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. शिवरत्न चौकात राहणारी जनाबाई भिवाजी बर्डे ही महिला देवाची गादी चालवते असे भासवून अनेक लोकांच्या दुःखात मार्ग सांगत असे. जनाबाई बर्डे सुख-दु:खाचे बघणे, बाहेरचे बघणे, त्यावर मार्ग, तोडगा सांगत असे. आजूबाजूच्या परिसरातील लोक तिच्याकडे उपायांसाठी येत होते. तिच्याकडे संशयित निकेश दादाजी पवार हा देखील दोन वर्षांपासून त्याच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी येत होता. मात्र त्याचे समाधान होत नसल्याने तो बराच अस्वस्थ होता. जनाबाईने सांगितलेल्या तोडग्याचा काहीही फायदा न झाल्याने त्याला प्रचंड राग आला होता.
शुक्रवारी दुपारच्या सुमारास संशयित निकेश पवार हा या जनाबाईच्या घरी गेला होता. शुक्रवारी त्याला मार्ग सांगण्याचा दिवस होता. जरावेळ बसल्यानंतर निकेशने जनाबाईची नजर चुकवून सोबत आणलेला चाकू बाहेर काढला. काही कळायच्या आतच निकेशने जनाबाईच्या मानेवर व शरीरावर सपासप वार केले. अचानक झालेल्या हल्ल्याने आणि वार वर्मी लागल्याने जनाबाई बर्डेचा जागीच मृत्यू झाला. जनाबाई घरातच रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.
त्यानंतर निकेशने हातात चाकू घेऊन तिथून पळ काढला. मात्र जनाबाईची मावस बहीण रंजना माळी यांनी जनाबाईला पाहून आरडाओरडा केला आणि त्या निकेशच्या मागे धावत सुटल्या. रंजना यांचा आवाज ऐकून लोकांनीही निकेशला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो महामार्गाने पळत टोलनाक्यापर्यंत गेला. नाशिकरोड पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाला या घटनेची माहिती समजताच त्यांनी टोलनाका येथे धाव घेऊन संशयित हल्लेखोर निकेश पवार याला ताब्यात घेतले. निकेश पवार याला अटक करुन नाशिक रोड पोलीस पुढील तपास करत आहेत.
दरम्यान घटनेची माहिती समजताच पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहाय्यक पोलीस आयुक्त अंबादास भुसारे, पोलीस निरीक्षक पवन चौधरी सहायक पोलीस निरीक्षक शेळके व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी घटनेची माहिती घेत तपास सुरु केला आहे.