nashik graduate constituency: नाशिक पदवीधर मतदारसंघामधून शिवसेनेकडून जाहीर पाठिंबा मिळालेल्या शुभांगी पाटील यांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्याने निवडणुकीमधील चुरस वाढली आहे. निडणुकीमधून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ निघून गेल्यानंतर पाटील यांनी आपला अर्ज मागे घेतला नसल्याने आता त्यांची थेट लढत सत्यजित तांबेंशी (Satyajeet Tambe vs Shubhangi Patil) होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. पाटील अर्ज मागे घेतील अशी चर्चा सकाळपासूनच सुरु होती.


पाटील आणि तांबे थेट लढत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाटील या नॉट रिचेबल होत्या. त्यांची गाडी दुपारच्या सुमारास सापडली मात्र अर्ज मागे घेण्याच्या वेळेपर्यंत त्यांचा ठावठिकाणा लागला नव्हता. तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीचे नेते गिरिश महाजन हे पाटील यांनी अर्ज मागे घ्यावा यासाठी प्रयत्न करत होते अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र आता पाटील आणि तांबे यांच्या थेट लढत होणार असून भाजपा तांबेना पाठिंबा जाहीर करणार का हे लवकरच स्पष्ट होणार आहे.


गिरीश महाजन नाशिकमध्ये तळ ठोकून


उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशीच पाटील नॉट रिचेबल असल्याने त्या उमेदवारी मागे घेणार अशी जोरदार चर्चा नाशिकमध्ये सुरु झाली होती. आधी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारीसाठी उत्सुक असलेल्या मात्र नंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेऊन शिवसेनेनं पाठिंबा जाहीर केलेल्या शुभांगी पाटील आज सकाळपासून संपर्काबाहेर आहे. भाजपाचे वजनदार नेते आणि संकटमोचक अशी ओळख असलेले गिरीश महाजन कालपासून शुभांगी पाटील यांच्या माघारीच्या प्रक्रियेसाठी नाशिकमध्ये तळ ठोकून होते. मात्र अगदी शेवटच्या क्षणापर्यंतही पाटील अर्ज मागे घेतील अशी शक्यता व्यक्त केली जात असतानाही त्यांनी अर्ज मागे घेतला नाही. "आम्ही शुभांगी पाटलांसोबत कोणताही संपर्क केलेला नाही," असं म्हटलं आहे. "शुभांगी पाटलांच्या मागणीनंतरच आम्ही त्यांना भाजपामध्ये प्रवेश दिला होता," असंही महाजन यांनी सांगितलं होतं. 


तांबेंना भाजपा पाठिंबा देणार?


दुसरीकडे दुपारी तीनच्या आसपास सत्यजीत तांबे आपल्या संगमनेरमधील निवासस्थानाबाहेर पडल्याचं दिसून आलं. काँग्रेसच्या पक्ष आदेशाविरोधात जात अपक्ष उमेदवार म्हणून उभे असलेले सत्यजित तांबे हे भाजपा पुरस्कृत उमेदवार ठरण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसने उमेदवारी देऊनही पुत्र सत्यजित तांबेसाठी पिता सुधीर तांबेनी माघार घेतली.