सागर गायकवाड, झी मीडिया


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Nashik Crime News: मित्रांसोबत आठवड्याभरापूर्वी पार्टीला गेलेल्या युवकाचा मृतदेह सापडला आहे. या घटनेमुळं नाशिक हादरले आहे. युवकाचा तीक्ष्ण हत्याराने वार करुन खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पंचक शिवारात युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. 


पंचक शिवारात सोमवारी दुपारच्या सुमारास जनावरांना चराईसाठी गोदाकाळी घेऊन जाणाऱ्या गुराख्यांना कुजलेला वास आला. त्यामुळं त्याने सतर्कता दाखवत गावकऱ्यांना कळवले. त्यानंतर या सगळ्या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत माहिती गोळा करताच एका इसमाचा मृतदेह असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. 


शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर या तरुणाचा निर्घृण खून केल्याचे समोर आलं आहे. ज्ञानेश्वर गायकवाड असं मृत युवकाचे नाव असून आठवड्याभरापूर्वीच त्याच्या पत्नीने तो बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. एका आठवड्यापूर्वी ज्ञानेश्वर मित्रांसोबत पार्टीसाठी गेला होता पण पुन्हा घरी परतलाच नव्हता. त्यामुळं त्याच्या बायकोने नाशिक रोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. 


पोलीस युवकाचा तपास करत असतानाच सोमवारी गोदाकाठी ज्ञानेश्वरचा मृतदेह सापडला आहे. या मृतदेहाचा पंचनामा केला असता त्याच्या छातीवर खोल जखमा आढळल्या आहेत. तसंच. चेहऱ्यावर सिमेंटसदृश्य पावडरदेखील टाकण्यात आल्याचे समोर आलं आहे. ज्ञानेश्वर गायकवाडचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याचे उघडकीस आलं आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर मोलमजुरी करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. मित्रांसोबत पार्टीला जायचं म्हणून ज्ञानेश्वरने घरातून जेवण तयार करून सोबत घेतले होते. दुपारच्या सुमारास दुचाकीने तो घरातून निघाला मात्र पुन्हा परतलाच नाही. स्थानिक पातळीवर त्याचा शोध घेण्यात आला. मात्र, तो कुठेच सापडला नाही. म्हणून अखेर त्याच्या बायकोने पोलिसात तक्रार दाखल केली, काल त्याचा मृतदेहच सापडला आहे. ज्ञानेश्वरचा खून कोणी व का केला याचा शोध नाशिक रोड पोलिसांकडून घेतला जात आहे. 


पुण्यातही घडला भयंकर प्रकार


पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. बहिणीला त्रास देत असल्याच्या कारणातून मेव्हण्याने दाजीच्या डोक्यात रॉड घालून हत्या केली आहे. त्यानंतर स्वतःदेखील त्याच खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच घटना घडली आहे. पुण्यातील बाणेर येथील हॉटेल मनाली परिसरात हा प्रकार उघडकीस आला आहे.