योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : शुक्रवारी पहाटे नगर मनमाड महामार्गावर आंबेवाडी शिवारात हुंडाई कारचा विचित्र अपघात झाला. मित्राला मनमाड रेल्वे स्थानक येथे सोडण्यासाठी जात असताना आंबेवाडी शिवारात हुंडाई कारला पाठीमागून अचानकच एका अज्ञात वाहनाने धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की त्यामुळं कार रस्त्याच्या तीस ते चाळीस फूट बाजूला हवेत उडाली आणि एका बाजूला फेकली गेली. काही क्षणात कारचा चक्काचुर झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अपघात इतका गंभीर ठरला की, कारमध्ये पाठीमागच्या सीटवर बसलेले दोघेजण जागीच ठार झाले, तर चालक गंभीर जखमी झाला आहे. आकाश रमेश पवार, निलेश दगु शेवाळे अशी मृतांची नावं सांगण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार हे दोघेही सावरगाव तालुका येवला येथील रहिवासी आहेत. तर, शुभम गंगाधर पानमळे असं जखमी चालकाचं नाव आहे. हा देखील सावरगाव येथील रहिवासी आहे. (Nashik News)


हेसुद्धा वाचा : पाऊस मोठ्या रजेवर जाणार? राज्यातील 'हा' भाग वगळता उर्वरित ठिकाणी उघडीप, तापमानवाढ घाम फोडणार  


नगर मनमाड महामार्गावर आंबेवाडी शिवारात झालेल्या या अपघातामध्ये कारचा एवढा चक्काचुर झाला होता की दोन्ही मृतदेह कारचा पत्रा कापून बाहेर काढावे लागले. या घटनेची माहिती मिळताच  स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केलं. ज्यानंतर तातडीनं घटनास्थळी खाजगी रुग्णवाहिका आणत दोन्ही मृतदेह उपजिल्हा रुग्णालय येवला येथे नेण्यात आले. तर, तिथंच जखमी चालकावर उपचारही सुरु करण्यात आले. दरम्यान, अपघात नेमका कसा झाला आणि कोणत्या वाहनानं धडक दिल्यामुळं हा गंभीर प्रसंग ओढावला? या प्रश्नांची उकल करत पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.