पाऊस मोठ्या रजेवर जाणार? राज्यातील 'हा' भाग वगळता उर्वरित ठिकाणी उघडीप, तापमानवाढ घाम फोडणार

Maharashtra Weather News : राज्यात सध्या पावसाचं प्रमाण कमी होत असून, कोकण आणि विदर्भाचा काही भाग वगळता उर्वरित भागांमध्ये पावसानं विश्रांती घेतली आहे.   

सायली पाटील | Updated: Sep 13, 2024, 06:55 AM IST
पाऊस मोठ्या रजेवर जाणार? राज्यातील 'हा' भाग वगळता उर्वरित ठिकाणी उघडीप, तापमानवाढ घाम फोडणार  title=
Maharashtra Weather news rain to take rest for a while konkan will have moderate rainfall

Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यातून आता खऱ्या अर्थानं पावसानं काढता पाय घेण्यास सुरुवात केली असून, टप्प्याटप्प्यानं विश्रांती घेत हा वरुणराजा मोठ्या रजेवर जाण्यासाठी सज्ज झाला आहे. एकिकडून पुढचे 24 तास मुसळधार पावसाचा अंदाज असतानाच दुसरीकडे मात्र वाऱ्याच्या बदललेल्या दिशेमुळं आता या प्रणालीतही महत्त्त्वाचे बदल झाल्याचं सांगत पुढील तीन दिवस तरी राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पाऊस उसंत घेईल. आठवड्याचा शेवट जरी पावसाच्या अनुपस्थितीत होणार असला तरीही सोमवारपासून विदर्भ पट्ट्यामध्ये हा पाऊस पुन्हा एकदा बरसणार असल्याचा अंदाज आहे. 

दरम्यान पुढील 24 तासांसाठी कोकण, सातारा, कोल्हापूर आणि पुण्यातील घाटमाथ्यावरील भागांमध्ये मात्र पावसाच्या जोरदार सरींचा अंदाज असून, इथं यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तिथं मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्येही घाट क्षेत्रामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

पाऊस मोठ्या विश्रांतीवर जाणार? 

मध्य भारतात सक्रिय असणाऱ्या कमी दाब क्षेत्रानं बाष्प खेचून नेल्यामुळं राज्याच्या कैक भागांमध्ये पाऊस विश्रांती घेताना दिसेल. विश्रांतीनंतर हा वरुणराजा परतणार असला तरीही तो कमीजास्त प्रमाणातच हजेरी लावणार असल्यामुळे आता मान्सून परतच्या प्रवासासाठी सज्ज झाला आहे असं म्हणणं गैर ठरणार नाही. 

हेसुद्धा वाचा : कोकणवासियांसाठी आणखी एक आनंदाची बातमी; Konkan Railway मुळं परतीच्या प्रवासाची चिंताच मिटली

 

दरम्यान, मान्सून वाऱ्यांचा प्रभाव असणारा कमी दाबाचा पट्टा अमृतसरपासून बंगालच्या उपसागरात ईशान्येपर्यंत सक्रिय असून, गुजरातपासून कर्नाटकपर्यंतही कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. ज्यामुळं राज्यातील हवामानावर याचे थेट परिणाम पाहायला मिळत आहेत. राज्यात अनेक भागांमध्ये सध्या पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळं तापमानात वाढ झाली आहे. काही जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंशांच्या पुढे गेलं आहे, तर, किमान तापमानातही वाढ झाल्यामुळं हा उकाडा आता नागरिकांना घाम फोडताना दिसत आहे.