बायकोच उठली जीवावर! बियर पाजून पतीचा गळा आवळला, नंतर सर्पदंशही घडवला; पण एक चमत्कार घडला
Nashik Crime News: संपत्तीच्या वादातून पत्नीने पतीचा जीव घेण्यासाठी धक्कादायक कट रचला. मात्र, दैव बलवत्तर म्हणून त्याचा जीव वाचला
Nashik Crime News: नाशिकमधून एक खळबळ उडवणारी बातमी समोर येतेय. बायकोच नवऱ्याच्या जीवावर उठल्याचा प्रकार समोर आला आहे. संपत्तीसाठी बायकोने नवऱ्याची हत्या करण्याचा कट रचला मात्र, दैव बलवत्तर म्हणून नवऱ्याचे प्राण वाचले आहेत. त्यामुळं पत्नीचा हा सगळा कट समोर आला आहे. नाशिकच्या बोरगड परिसरातील ही धक्कादायक घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल पाटील यांनी पत्नीविरोधात तक्रार दाखल केली आहे. संशयित पत्नी सोनी हिने तिच्या साथीदारांसह संपत्ती हडपण्यासाठी नवऱ्याच्या हत्येचा कट रचला. सुरुवातीला तिने नवऱ्याला बियर पाजली नंतर त्याचा गळा आवळला मात्र तरीही पती सुखरुप होता. शेवटी तिने क्रुरतेची परिसीमा गाठली.
पत्नीच्या साथीदाराने विशालचा गळा आवळतानाच त्याच्या गळ्यावर विषारी साप धरुन गळ्यावर जबरदस्ती दंश करवला. मात्र सुदैवाने विशाल तेव्हा शुद्धीत होता. त्यामुळं त्याने तिथून पळ काढला व तो त्याच्या मित्राच्या घरी पोहोचला. मित्राने कसेबसे त्याला मध्यरात्री जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याच्यावर तात्काळ उपचार करण्यात आले. सुदैवाने वेळेत उपचार मिळाल्याने त्याचा जीव बचावला आहे.
विशाल आणि त्याची पत्नी एकता यांच्यात सतत वाद होत असतं. पत्नी एकता हिला सतत पैसे खर्च करण्याची सवय होती. त्यामुळं संपत्तीवरुन त्यांच्यात वाद होत होते. एकदा पत्नी घर सोडूनही गेल्याचा दावा विशाल याने केला होता. मात्र, त्याने तिची समजूत काढल्यानंतर ती पुन्हा घरी आली. त्यानंतर त्यांच्यात सर्व काही सुरळीत होते. मात्र, अचानक पत्नीने साथीदारासंह कट रचून विशालला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
पत्नीने साथीदारांच्या मदतीने बियर पाजून तोंड उशिने दाबून सर्पदंश देत ठार मारण्याचा प्रयत्न केलाच त्याचबरोबर विशालच्या डोक्यात हेल्मेट मारल्याचंही त्याने फिर्यादीत नमूद केलं आहे. सुदैवाने विशालचा जीव वाचला आहे. संशयित सोनी उर्फ एकता जगतापसह तिच्या दोघा अज्ञात साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पती विशाल पाटील याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसंच, म्हसरूळ पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे.
पोलिसांसमोरही रचला बनवा
एकताने विशालवर हल्ला केल्यानंतर त्याने कसाबसा आपला जीव वाचवत तिथून पळ काढला. आता आपले बिंग उघडे पडेल या भीतीने एकताने म्हसरुळ पोलीस ठाणे गाठले आणि तिने आमच्या घरात कोणीतरी हल्ला केला, असा दावा केला. मात्र, पोलिसांना संशय आल्याने त्यांनी तिची अधिक चौकशी केली. त्याचवेळी जिल्हा रुग्णालयातून एका व्यक्तीला जबरदस्ती संर्पदंश केल्याचा फोन आला. तेव्हा पोलिसांनी रुग्णालयात धाव घेऊन अधिक चौकशी केली. तेव्हा एकताचे सर्व बिंग फुटले. पोलिसांनी तिच्या साथीदारासह तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे.